Join us

देवभूमी समजल्या जाणाऱ्या हिमाचल प्रदेशात देवी देवताही आहेत फळबागायतदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 14:59 IST

हिमाचल प्रदेशाला देवभूमी असे संबोधन आहे. या ठिकाणी अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. त्यांच्या नावावर शेत जमीनही असते. त्या विषयी जाणून घेऊ या.

देवी देवतांच्या नावावर फळबागा... वाचून आश्वर्य वाटले ना. पण हिमाचल प्रदेशमध्ये अनेक मंदिरांच्या देवी-देवतांच्या नावावरही फळबागा, शेती असून त्यातून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्नही मिळते. हिमालय म्हणजे देवभूमी समजली जाते. इथे अनेक देवदेवतांची मंदिरे, स्थान आहेत. तसेच अनेक आश्रमही इथे आहेत. या देवतांच्या आणि मंदिरांच्या नावावर अनेक एकर जमीन असते. 

हिमाचल प्रदेशातशेतकरी आणि बागायतदार देवांना पहिले पीक अर्पण करतात. याचे कारण येथील लोकांची अशी धारणा आहे की शेतीचे खरे मालक देवी-देवता आहेत. येथील देवता नियमितपणे आपल्या शेताला भेटही देतात. ज्याला ‘धवला यात्रा’ म्हणतात. थोडक्यात त्यांची पालखीने शेतात मिरवणूक काढली जाते. या वेळी देवी-देवता त्यांच्या जमिनीवर वास्तव्य करतात आणि शेतकऱ्यांना सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात.

शिमला जिल्ह्यातील डोमेश्वर देवता, रोहरू येथील गुदारू महाराज या देवस्थानांच्या नावावर सफरचंदाच्या बागा आहेत. जुब्बल येथील हटेश्वरी मातेच्या नावावरही सफरचंदाची बाग आहे. या बागांमधून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. पारंपारिक रॉयल ऍपल व्यतिरिक्त डोमेश्वर देवता गुठाण येथे उच्च  तंत्रज्ञान असलेली आधुनिक फळबाग देखील आहे. येथे उच्च घनता तंत्रज्ञानावर लावलेली सुमारे 400 झाडे आहेत. स्थानिक नर्सरींमधून रोपे आणून या बागेची लागवड करण्यात आली आहे.

याशिवाय पारंपारिक शाही जातीच्या सफरचंदांची मोठी बाग आहे. केवळ बागाच नव्हे, तर येथील देवतांसाठी राखीव जंगलही आहे. रोहरूचे आराध्य दैवत गुदारू महाराज गावस यांची ८० बिघे जमिनीवर मोठी बाग आहे. या बागेत 1500 सफरचंदाची झाडे आहेत, तर 5 ते 10 बिघ्यांच्या आणखी दोन बागा आहेत. यातून मंदिर समितीला वार्षिक 15 ते 20 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. 

जुब्बल तालुक्यातील हटेश्वरी मातेकडेही सफरचंदाची मोठी बाग आहे. सुमारे सहा हेक्टरच्या बागेत चार हजारांहून अधिक झाडे आहेत. बागेत नवीन रोपे लावली आहेत. सध्या यातून मंदिर ट्रस्टला वर्षाला सुमारे 8 ते 12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. पाच वर्षांनंतर पूर्ण क्षमतेने फळधारणा होऊ लागल्यावर हेच उत्पन्न वार्षिक 25 ते 30 लाखांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :हिमाचल प्रदेशशेतकरीशेती क्षेत्र