Join us

लाल रंगाचा गावरान घेवडा एकदा खाऊन तर बघा! १ 'बी'पासून मिळते ६०० किलो उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 21:23 IST

सध्या प्रत्येक भाज्यांचे देशी वाण नष्ट होत चालले असून मोहोळच्या अनिल गवळी यांनी अशा अनेक बियाणांचे संवर्धन केले आहे.

सध्या प्रत्येक भाज्यांचे देशी वाण नष्ट होत चालले आहेत. देशी वाणाचे आरोग्यदायी फायदे आपल्या सर्वांनाच माहिती असतात पण देशी वाणाचे उत्पन्न कमी असल्यामुळे शेतकरी या वाणाची लागवड करत नाहीत. तर हायब्रीड वाण विकसित होऊ लागल्यामुळे अन्नातही हायब्रीड खाद्य लोकं खाऊ लागले आहेत. पण देशी वाण हे आरोग्यासाठी हायब्रीड वाणांपेक्षा कितीतरी पटीने फायद्याचे ठरतात.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील रहिवाशी असलेल्या अनिल गवळी यांनी अशा अनेक बियाणांचे संवर्धन केले आहे. त्यातीलच हा गावरान लाल रंगाचा घेवड्याचा वाण आहे. जसा आपण हिरव्या रंगाचा घेवडा बाजारातून विकत घेतो त्याचप्रमाणे हा घेवडा लाल रंगाचा असल्यामुळे आकर्षक दिसतो. तर आरोग्यासाठी हा घेवडा अत्यंत उपयुक्त असतो. 

घेवड्याच्या शेंगाची उसळ किंवा भाजी केली जाते. शेंगा वाळल्यानंतरही त्याच्या बियांपासूनही उसळ केली जाते. त्यामुळे याचा दुहेरी उपयोग होऊ शकतो. तर या घेवड्याची चव एकदा घेतली की जिभेवर रेंगाळेल आणि पुन्हा पुन्हा हा गावरान घेवडा खाण्याची इच्छा होईल असं देशी वाणाचे संवर्धन करणारे अनिल गवळी सांगतात.

उत्पन्नलाल घेवड्याची एकदा लागवड केली की आपण तीन वर्षांपर्यंत उत्पन्न घेऊ शकतो. त्याचबरोबर या गावरान घेवड्याच्या एका बी पासून प्रत्येक वर्षी चक्क ३०० ते ६०० किलोपर्यंत उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे गावरान वाण चांगले उत्पन्न देणारे ठरू शकते.

आपण हायब्रीड वाण खात असल्यामुळे आपल्यामध्ये जास्त रोगांचे प्रमाण वाढले आहे. जुन्या लोकांनी गावरान वाण खाल्ल्यामुळे त्यांच्यामध्ये आरोग्य टिकून होते. सध्याच्या हायब्रीड खाण्यामुळे कमी वयातही हृदयविकारासारखे आजार येऊ लागले आहेत. - अनिल गवळी (देशी वाणांचे संवर्धन करणारे शेतकरी, मोहोळ)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी