Join us

मक्याचे गाव म्हणून चिंचोली गावाची ओळख, एकरी 20 ते 22 क्विंटलचा उतारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 14:02 IST

यंदा मक्याचे उत्पादन वाढल्याने शेतकरी समाधानी आहेत.

गोविंद शिंदे

कंधार तालुक्यातील चिंचोली (प. कं ) हे गाव मक्याच्या सर्वाधिक विक्रमी पेरणी करणारे गावातून विक्रमी मक्का घेणारे प्रसिद्ध शेतकरी ओळख निर्माण होत आहे तालुक्यातच नसून जिल्ह्यात सर्वाधिक पेरा मक्याचा या गावात दरवर्षी असल्यामुळे या गावाची ओळख मक्याचे गाव म्हणून ओळख झाली आहे

कंधार तालुक्यातील बारूळ मंडळातील व परिसरात चिंचोली या गावात  मका पेरणी सर्वाधिक केली जाते. एकरी 20 ते 22 क्विंटलचा उतारा मिळत असल्याने शेतकऱ्यात समाधान व्यक्त केले जात आहे. मागील दोन वर्षापासून मक्याच्या उताऱ्यात लक्षणीय घट झाली होती. मागील वर्षात तर एकरी दहा ते पंधरा क्विंटलचा उतारा मिळत होता. हजारो रुपये खर्च करून शेतकऱ्यांच्या पदरात काही पडत नसल्याने मका उत्पादकांना फटका सहन करावा लागला होता. मात्र, यंदा मक्याचे उत्पादन वाढल्याने शेतकरी समाधानी आहेत.

चिंचोली या एकाच गावात सर्वाधिक 50 हेक्टर पर्यंत उन्हाळी मका घेतला जातो. इतर पिकाच्या तुलनेत अधिकचे उत्पन्न देणारे पीक म्हणजे मका आहे. या गावातील अनेक शेतकरी अधिकचे उत्पन्न मका पिकातून घेतात. गावातील बहुतांश शेतकरी या पिकाला पसंती दिली आहे. येथील विठ्ठल कौसल्ये शेतकऱ्याने दीड एकर शेतीत 40 क्विंटल मक्याचे उत्पन्न काढले असून पारंपारिक पिकाला फाटा देऊन यावर्षी त्यांनी हे विक्रमी पीक घेतले आहे. चार महिन्यात त्यांना दीड एकर साठी बियाणे खते औषध मजुरीसाठी त्यांना 15 हजार खर्च आले, तर 88 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. चार महिन्यात त्यांनी 60 हजाराचे उत्पन्न काढले आहे.

व्यापारी येतात गावात मका खरेदीसाठी..

या गावात झालेला मका बाजारात विकण्याची गरजही पडत नाही. पोल्ट्री फार्म व्यापाऱ्यांसह नांदेड, लातूर, परभणी परिसरातील जिल्ह्यातील व्यापारी व पोल्ट्री फार्म चालक हे इथून थेट मका बाजारभावाप्रमाणे शेतातून घेऊन जातात. परिणामी शेतकऱ्यांचा वाहनाचा व इतर खर्चही वाचतो. गावाची ओळख ही मक्यासाठी उत्पन्नासाठी आता होत असल्याने कृषी विभागाने या गावाला मक्यासाठी विशेष योजना व मार्गदर्शन करावे अशी मागणी होत आहे.

टॅग्स :मकाशेतीपीक