पार्डी ताड : पिंपळखुटा गावातील प्रगतिशील शेतकरी देवानंद धोटे यांनी आपल्या चार म्हशींसाठी हायड्रोपोनिक्स (Hydroponic) तंत्राचा उपयोग करून हिरवा चारा तयार करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
हायड्रोपोनिक्स शेतीत मातीऐवजी पाण्याच्या प्रवाहात पोषक द्रावणाचा वापर करून वनस्पतींची लागवड केली जाते. धोटे यांनी मका व गहू यांसारख्या बियाण्यांची निवड करून हिरवळ चारा तयार केला आहे.
बियाण्यांना २४ तास पाण्यात भिजवून, त्यानंतर जुटाच्या बारदानामध्ये ठेवले जाते. अंकुर फुटल्यानंतर त्यांना प्लास्टिक ट्रेमध्ये ठेवून नियमित पाणी शिंपडले जाते. आठ दिवसांत हा चारा तयार होतो. मागील महिन्यापासून त्यांनी या पद्धतीने चारा तयार करणे सुरू केले आहे.
बांबू व अँगलचा वापर
आर्थिक अडचणींमुळे त्यांनी कमी खर्चात बांबू व अँगलचा वापर करून सेट तयार केले. हिरव्या जाळ्यांऐवजी घरातील जुन्या साड्यांचा वापर करून त्यांनी या उपक्रमाची अंमलबजावणी केली.
हायड्रोपोनिक तंत्राच्या वापरामुळे कमी जागेत, कमी खर्चात चारा उत्पादन शक्य झाले असून हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.
हिरवळ चाऱ्यामुळे दूध उत्पनात वाढ
धोटे आपल्या प्रत्येक म्हशीला दररोज आठ किलो हिरवळ चारा देतात, ज्यामुळे त्यांच्या दूध उत्पादनात वाढ झाली असून दूधाला चांगला दर मिळतो.
अनेक शेतकऱ्यांकडून चाऱ्याची पाहणी
प्रगतिशील शेतकरी देवानंद धोटे यांनी त्यांच्या म्हशींसाठी हायड्रोपोनिक्सव्दारे निर्माण केलेल्या हिरवा चाऱ्याची पाहणी परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तसेच, या उपक्रमाचे कौतूक केले आहे.
धोटे यांनी सांगितले की, हायड्राेपोनिक्स तंत्राचा वापर करताना मी घरातील वस्तूंचा वापर करून शेड तयार केला त्यामुळे खर्च कमी लागला आणि ताजा आणि हिरवा चारा आता रोज ८ किलो प्रत्येक म्हशींना दिला जातो.
हे ही वाचा सविस्तर : Organic Fertilizer : अखेर एफआयआर झाला दाखल; अवैध खत विक्री प्रकरण वाचा सविस्तर