Join us

कर्जबाजारी शेतकरी एका रात्रीत झाला अब्जाधीश, अख्ख्या जिल्ह्यात होतेय त्याचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 17:24 IST

कर्जामुळे बँक खाते एनपीए झालेला शेतकरी एका रात्रीत अब्जाधीश झाला आहे. सध्या त्याच्या गावातच नव्हे, तर जिल्ह्यात त्याची चर्चा आहे.

अनेक बागातदार शेतकरी शेतमाल विक्रीतून लक्षाधीश होतानाच्या बातम्या आपण वाचतो, ऐकतो, मागच्या वर्षी टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असताना पुणे जिल्ह्यातील काही शेतकरी तर कोट्यधीश झाले होते. शेतीला जोडव्यवसायाची साथ देऊन हजारो प्रयोगशील शेतकरी कोट्यधीश झाल्याची उदाहरणे आहेत. मात्र आज जी बातमी आपण वाचणार आहोत, तिच्यामुळे तुम्हाला आश्वर्याचा जोरदार झटका बसल्याशिवाय राहणार नाही. कारण या बातमीत उल्लेख आलेला शेतकरी लक्षाधीश, कोट्यधीश नव्हे, तर अब्जाधीश झाला आहे. आणि तेही एका रात्रीत. सध्या गावात नव्हे, तर अख्ख्या जिल्ह्यात हीच चर्चा आहे.

ही घटना आहे उत्तर प्रदेशमधील भदोही जिल्ह्यातली. येथील एका शेतकऱ्याच्या बंद असलेल्या बँकेच्या खात्यात अचानक १०० अब्ज रुपये जमा झाले. तसा मेसेजही शेतकऱ्याला आला. त्यामुळे त्याला आनंदानं आभाळ ठेंगणं झालं. मग त्या शेतकऱ्याने बँकेत धाव घेत खात्यात एन्ट्री केली खरी, पण ही बाब व्यवस्थापकाला कळताच त्यांने शेतकऱ्याचे खाते सील केले. इतके पैसे खात्यात कुठून आले, याच्या चौकशीसाठी आता बँकेच्या मुख्य कार्यालयाला पत्र लिहिण्यात आले आहे.

तर हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील भदोही जिल्ह्यातील अर्जुनपूर गावात राहणाऱ्या शेतकरी भानुप्रकाश बिंदचे याचे आहे. भानुप्रकाशचे बँक ऑफ बडोदा ग्रामीण बँकेचे आहेत. 

नुकतेच १६ मे या तारखेला अचानक त्यांच्या मोबाईलवर खात्यात पैसे जमा झाल्याचा बँकेचा मॅसेज आला. त्यानुसार तब्बाल ९९ अब्ज ९९ कोटी ९४ लाख  ९५ हजार ९९९ रुपये जमा झाले असल्याची माहिती एका हिंदी संकेतस्थळाने दिली. 

दरम्यान कर्जबाजारी शेतकरी असलेल्या भानू प्रकाश यांना मेसेज समजला नाही, तेव्हा त्यांनी इतर काही लोकांशी चर्चा केली. लोकांनी भानू प्रकाश यांना सांगितले की, तुमच्या खात्यात कोणीतरी खूप पैसे जमा केले आहेत. हे ऐकून भानू प्रकाश थक्क झाले. त्यांचा सुरूवातीला  या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. मात्र त्यांनी बँकेत जाऊन बँक कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. तिथे त्यांनी खाते तपासल्यावर त्यांना आश्वर्य वाटले. कारण त्यांच्या खात्यात खरंच १०० अब्ज रुपये इतकी रक्कम जमा झाली होती.

बँकेच्या व्यवस्थापकाने या घटनेला दुजोरा दिला अहे. मात्र संबंधित शेतकऱ्याचे खाते सील करण्यात आल्याचे बँकेचे व्यवस्थापक तिवारी यांनी सांगितले आहे.

भानू प्रकाश यांचे बचत खाते किसान क्रेडिट कार्डशी जोडलेले आहे. कर्ज फेडता न आल्याने त्यांचे खाते एनपीए झाले आहे. मात्र हे खाते एनपीए झाल्यानंतर हा प्रकार घडला असावा असा तर्क बँक अधिकाऱ्यांनी लावला आहे. एवढ्या मोठ्या रकमेची माहिती मिळताच शेतकऱ्याचे खाते तात्काळ होल्डवर ठेवण्यात आले. हा पैसा कुठून आला याची चौकशी करण्यासाठी मुख्यालयाला पत्र लिहिण्यात आल्याचे बँकेने सांगितले. तो पर्यंत तरी शेतकरी अब्जाधीश झालाय.

टॅग्स :शेतकरीशेती क्षेत्रबँक