Join us

'रासायनिक खतांमुळे होतात भयंकर आजार! शेतकऱ्यांनी जिवाणू खतांचा वापर वाढवावा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 22:22 IST

जिवाणू खतांचा वापर केल्याने जमिनीची शाश्वत सुपीकता टिकवून राहते

पुणे :  सध्या शेतीतील रासायनिक खतांचा वापर कमालीचा वाढला आहे. त्यामुळे मानवी जिवनावर विपरीत परिणाम होत असून शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे एकरी ऊस उत्पादन वाढीबरोबरच शेतकऱ्यांनी मातीच्या सुपिकतेकडे तिकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. भविष्यकाळामध्ये येणाऱ्या पिढीच्या हातात सुपीक जमीन देणे ही काळाची गरज असणार आहे.

म्हणून शेतकऱ्यांनी रासायनिक खतांच्या बरोबर जिवाणू खतांचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे असं मत माळशिरस तालुक्यातील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी एस. पी. भालेराव यांनी व्यक्त केलं आहे.

उस शेती करत असताना एॅझिटोबॅक्टर, अॅझोफोस्पोकल्चर, डीकंपोजिंग कल्चर, ट्रायकोडर्मा यासारख्या जिवाणू खतांचा वापर करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर घरी तयार होणारे शेणखत, पालापाचोळ्यापासून बनवलेले खत, जीवामृत, गांडूळ खत यांचा वापर केल्यामुळे मातीतील सेंद्रीय कर्ब वाढण्यास मदत होते. परिणामी रासायनिक खतांवरील खर्च वाचून एकरी ऊस उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.

जिवाणू खतांचा वापर केल्याने जमिनीची शाश्वत सुपीकता टिकवून ठेवून आपण दीर्घकाळ ऊस उत्पादन घेऊ शकतो. त्याचबरोबर मातीत जाणारे क्षार थांबवण्यासाठी आणि अनावश्यक पाण्यावरील खर्च टाळून जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आपण ठिबक सिंचनाचा वापर करणे गरजेचे आहे. पिकांसाठी युरियाचा वापर कमी केला तर येणाऱ्या काळात पाण्याचे स्त्रोत टिकून ठेवता येतील, कारण पूर्वीपासून ज्या ठिकाणी बोर आणि विहिरी आहेत या ठिकाणचे पाणी दिवसेंदिवस खराब होत चाललेले आहेत असं मत त्यांनी व्यक्त केलं. 

रासायनिक खतांमुळे होणारे आजाररासायनिक खते शेतीसाठी वापरल्यामुळे पाण्यामधील कार्बोरेटचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे लहान मुलांचे केस पिकणे, केस गळणे, अर्धांगवायू होणे, मुतखडा होणे यासारखे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत.

रसायनिक खतांमुळे होणारे नुकसान वाचवणे किंवा कमी करणे हे शेतकऱ्यांसाठी भविष्यातील आव्हान असणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून जिवाणूयुक्त खतांचा वापर वाढवणे गरजेचे आहे.- एस. पी. भालेकर (ऊस विकास अधिकारी, पांडुरंग सहकारी साखर कारखाना, माळशिरस)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी