Pune : मधमाशा कमी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा आणि पिकांच्या उत्पादनात घट झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेकांनी आपल्या शेतात मधमाशाच नसल्याचेही निरिक्षण केले आहे. त्यामुळे सध्याच्या काळात मधमाशीपालन करणे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरले आहे.
दरम्यान, निसर्गामध्ये वनस्पतीपासून अन्ननिर्मिती किंवा फळांचा निर्मिती होण्यासाठी परागीभवन गरजेचे असते. वारा, कीटक, पक्षी आणि मधमाशांकडून निसर्गामध्ये परागीभवन केले जाते. अनेक ठिकाणी मानवनिर्मित परागीभवन सुद्धा केले जाते. पण मधमाशांकडून निसर्गातील सर्वांत जास्त परागीभवन केले जाते. सध्या रसायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे मधमाशांचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे.
रासायनिक खतांचा वापर, पाण्याची कमतरता असणे, फुले येणाऱ्या पिकांची अनुपलब्धता अशा अनेक कारणांमुळे मधमाशांचे प्रमाण कमी झाले आहे. तर सध्या संवर्धिक मधमाशा शेतामध्ये ठेवण्याचे प्रमाण वाढायला सुरूवात झाली आहे.
अनेक शेतकरी वेगवेगळ्या जातींच्या मधमाशांच्या पेट्या आपल्या शेतामध्ये परागीभवनासाठी ठेवताना दिसून येत आहेत. ज्यामध्ये परदेशी मधमाशी मेलिफेरा आणि भारतीय मधमाशी सातेरी या मधमाशांचा प्रामुख्याने समावेश आहे.
मधमाशीपालनामुळे केवळ परागीभवनच नाही तर त्यापासून मध, मेण, रॉयल जेली, पोलन अशा वेगवेगळ्या उपपदार्थांची निर्मिती करून विक्री करता येते. त्यामुळे शेतीच्या फायद्यासोबत मधमाशीपालन हा व्यवसाय आर्थिक हातभार लावण्यासाठी शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे.