Join us

वऱ्हाडात अतिवृष्टीचा फटका; बळीराजाला हवेत ६८७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2023 12:03 IST

वऱ्हाडात बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आल्यानंतर ६८७ कोटींच्या मदत निधीची मागणी विभागीय आयुक्तांद्वारा बुधवारी शासनाकडे करण्यात आली

जुलै महिन्यात संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भात ८.६६ लाख शेतकऱ्यांच्या ७.५२ लाख हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. या बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आल्यानंतर ६८७ कोटींच्या मदत निधीची मागणी विभागीय आयुक्तांद्वारा बुधवारी शासनाकडे करण्यात आली.

मान्सूनला तीन आठवड्यांनी उशिरा आला असला तरी ५ जुलैपासून त्याने दमदार आगमन केले. विभागात जुलैमध्ये संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे ७,२२,८७४ हेक्टरमधील जिरायती, बागायती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पंचनाम्याद्वारे स्पष्ट झाले. यासाठी 'एनडीआरएफ'च्या नव्या निकषाने ६८६.८२ कोटींच्या निधीची मागणी व नदी-नाल्यांना पुराने ६१७५६ शेतकऱ्यांची ३० हजार हेक्टरमधील शेती खरडून गेलेली आहे. यासाठी ७८.७५ कोटींची मागणी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी शासनाकडे केली आहे.

जिरायती पिकांचे ५७७ कोटींचे नुकसान आपत्तीमुळे ७.८४ लाख शेतकऱ्यांच्या ६.७९ लाख हेक्टरमधील पिकांचे मोठे नुकसान झाले. यासाठी ५७७ कोटींचा शासन निधी आवश्यक आहे. यामध्ये ३.१४ लाख हेक्टर सोयाबीन २.६२ लाख हेक्टर कपाशी, ८७६७१ हेक्टर तूर. २११६ हेक्टर मूग, १८६० हेक्टर उडीद, ९४६ हेक्टर ज्वारी, ६४९९ हेक्टर मका व ३४९७ हेक्टरमधील इतर पिकांचे नुकसान झालेले आहे.

याशिवाय बागायती क्षेत्रात ज्वारी, केली, पपई, मका, भाजीपाला, हळद व इतर पिकांचे १७२० हेक्टरमध्ये नुकसान झालेले आहे. यासाठी २.९२ कोटींचा निधी आवश्यक आहे तर फळ पिकाखालील १२६२७ हेक्टरमधील संत्रा, लिंबू, मोसंबी, डाळिंब, केळी व इतर पिकांचे नुकसान झाले. त्यासाठी २८.४१ कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे.

जिल्हानिहाय आवश्यक निधी (हेक्टर/लाखात)कंसात अनुक्रमे बाधित शेतकरी, बाधित क्षेत्र आणि आवश्यक निधीअमरावती (९५९६३ / ७२१२४ / ७४६४.७०)अकोला (२०५५४० / १६८९३७ / १६४१२४.५१)यवतमाळ (३१५९९७ / २६४९८६ / २३६३०.९६)बुलडाणा (१८५६९२ / १५९५९९ / १६११०.५०)वाशिम (६३६२३ / ५७२२६ / ५०६१.९५)एकूण (८६६८१५ / ७२२८७४ / ६८६८२.६२)

टॅग्स :पाऊसपीकखरीपशेतीशेतकरीअमरावती