Join us

Hapus Mango : स्पेशल देवगडचा हापूस खरेदी करा शेतकऱ्यांकडून! शेतकऱ्यांनीच आयोजित केलाय हापूस महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 22:40 IST

गुलटेकडी मार्केट यार्ड येथे असलेल्या वखार महामंडळाच्या जागेवर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून येथे या शेतकरी सहकारी संस्थेचे २० शेतकरी सहभागी झाले आहेत.

Pune  : पुण्यातील मार्केट यार्ड येथे कोकणातील देवगड आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी थेट देवगड आंब्याची विक्री सुरू केली आहे. देवगड हापूस जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून खात्रीशीर आंबा खरेदी करता यावा यासाठी देवगड येथील श्री सिद्धीविनायक आंबा उत्पादक सेवा सहकारी संस्थेने हा पुढाकार घेतला आहे. 

गुलटेकडी मार्केट यार्ड येथे असलेल्या वखार महामंडळाच्या जागेवर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून येथे या शेतकरी सहकारी संस्थेचे २० शेतकरी सहभागी झाले आहेत. या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेला स्पेशल देवगड हापूस आंबा विक्रीसाठी पुणेकरांसाठी उपलब्ध केला आहे. थेट शेतकऱ्यांना माल विक्री होत असल्यामुळे या शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मिळत आहेत.

कोकणातील वेंगुर्ल्यापासून अलिबागपर्यंत हापूस आंबा पिकवला जातो पण या देवगड हापूस आंब्याचे वैशिष्ट्ये वेगळे आहे. हा परिसर समुद्राच्या किनारी असून येथील खडकावर आंब्याच्या बागा आहेत, त्यामुळे या आंब्यामध्ये गोड-आंबट चव आणि कमी जाडीची साल आढळते. त्यामुळे या आंब्याला वेगळी ओळख देण्याचा आमचा प्रयत्न आहे अशी माहिती निलेश पुजारी या शेतकऱ्याने सांगितली.

दरम्यान, हा आंबा महोत्सव शेतकऱ्यांनी आपल्या स्वखर्चातून आयोजित केला असून हा आंबा महोत्सव २४ मार्च रोजी सुरू झाला असून ३१ मे पर्यंत सुरू असणार आहे. जास्तीत जास्त पुणेकरांनी देवगड हापूस आंब्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री सिद्धीविनायक आंबा उत्पादक सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुहास डोंगरकर यांनी केले आहे. 

टॅग्स :आंबाशेतकरीशेती क्षेत्र