Join us

केशर आंब्याच्या बागेत भुईमूग लागवड; केंद्रेवाडी येथील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 16:23 IST

अल्पभूधारक शेतकऱ्याने केली किमया अवघ्या दीड एकरामध्ये केली केशर आंब्याच्या बागेत भुईमूग पीकाची लागवड. वाचा सविस्तर

किनगाव : अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील शेतकरी शिवहार नरबा केंद्रे यांनी आपल्या दीड एकर शेतात २४० केशर आंबा रोपांची लागवड केली असून, आंतरपीक म्हणून त्यात भुईमुगाचे पीक घेतले आहे. सध्या भुईमुगाचे पीक बहरले असून अधिक उत्पन्न येण्याची आशा शेतकऱ्याला आहे.

किनगाव परिसरात यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाला असून नदी, तलाव, विहिरी भरल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये रब्बी हंगामात भुईमूग पीक पेरणी केली आहे.

केंद्रेवाडी येथील शेतकरी शिवहार नरबा केंद्रे यांनी दीड एकर शेतीत २४० केशर आंब्यांच्या रोपांची लागवड केली असून अंतर पीक म्हणून दोन महिन्यांपूर्वी ८० किलो भुईमूग बियाणांची पेरणी केली.  

यातून शेतकऱ्याला २५ क्विंटल भुईमुगाचे उत्पादन मिळणे अपेक्षित असून एक लाख ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी आशा आहे. वेळोवेळी कृषी विभागाच्या वतीने औषध फवारणी बद्दलची माहिती केंद्रे घेत आहेत. यासाठी कृषी सहायक एम. टी. गोणे यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यांची मिळाली साथ

केंद्रे यांना शेतीमध्ये पत्नी चंद्रकला, मुले माधव आणि नागनाथ केंद्रे तसेच सरपंच ज्योती व अंजना या सुनांचे सहकार्य मिळते. त्यामुळे त्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.

शेतीसोबत जोडव्यवसाय करणे गरजेचे

नियोजनबद्ध शेती केल्यास व पाण्याची उपलब्धता असेल तर शेतकरी चांगल्या प्रकारचे उत्पन्न काढू शकतो. शेतीबरोबर जोड व्यवसाय करणे गरजेचे आहे.- शिवहार केंद्रे, शेतकरी

टॅग्स :शेती क्षेत्रआंबाशेतकरीशेती