Join us

Green Manure : हिरवळीचे खत - सेंद्रीय शेतीसाठी अन् मातीसाठी वरदान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 20:45 IST

हिरवळीच्या खतामध्ये फॉस्फरस वापरणे फायदेशीर ठरते. फॉस्फरस वनस्पतींच्या मुळांच्या वाढीस आणि ऊर्जेच्या संचयाला मदत करतो. हिरवळीचे खत मुख्यतः नायट्रोजनचे प्रमाण वाढवते, पण त्यात फॉस्फरस कमी असतो.

डॉ. समाधान सुरवसे, डॉ. अभिनंदन पाटील व डॉ. अशोक कडलग (वसंतदादा शुगर इन्टिट्यूट, मांजरी बु. पुणे)(मो. न. ९८६०८७७०४९, ९७३७२७५८२१)

रासायनिक खतांचा दीर्घकालीन असंतुलीत वापर केल्याने मातीच्या भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्मांमध्ये विषमता निर्माण होऊन मातीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मातीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता कमी होते. मातीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता उत्तम ठेवण्यासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा आहे. सेंद्रिय कर्ब हा मातीचा आत्मा आहे तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे तो शाश्वत शेतीचा गाभा आहे.

वनस्पतीमध्ये सर्वसाधारणपणे ८० टक्के पाणी आहे व उरलेल्या २० टक्के शुष्क पदार्थ असतात.  शुष्क भागाचे पृथक्करण  केले असता त्यातील जवळजवळ ९६. ४ टक्के प्रमाण हे हवा व वायू मार्फत मिळणाऱ्या अन्न घटकाचे असून त्यामध्ये ४५ टक्के कर्ब, ४५ टक्के प्राणवायू आणि ६. ४ टक्के हायड्रोजन असतो.  वनस्पतीमध्ये पीक पोषण अन्नद्रव्याचे प्रमाण अत्यल्प आहे, तरी पण आपण त्याला खूप ज्यास्त महत्त्व देतो तर ९६. ४ टक्के शुष्क पदार्थ तयार करण्यामधील सर्वात महत्त्वाचा घटक कर्ब असूनहि याकडे आपण पुरेस लक्ष्य देत नाही.

हिरवळीचे खत म्हणजे जमिनीत सेंद्रिय पदार्थ मिळण्यासाठी आणि नायट्रोजन या मुख्य अन्न घटकाचे प्रमाण सुधारून जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी विविध वनस्पती शेतात उगवून नांगरून गाडून टाकल्या जातात किंवा वनस्पतींचे अवशेष जसे कि पाने, फांद्या इत्यादी शेतात गाडले जातात.  

हिरवळीच्या खतांचे प्रकार1.स्थलिक हिरवळीचे खत-स्थलिक हिरवळीचे खत (धैंचा, ताग, उडीद, मुग, गवार इत्यादी) शेतात पेरून ५० टक्के फुलोऱ्यावर आल्यावर नांगरून जमिनीत गाडून टाकतात. यामुळे माती सेंद्रियदृष्ट्या समृद्ध होते.

2.बाह्य हिरवळीचे खत-बाह्य हिरवळीची खते जसे की गिरीपुष्प, झाडांची वाळलेली पाने, पिकांचा काडीकचरा, शेंगावर्गीय पिकांचे अवशेष किंवा सेंद्रिय वनस्पती इतर ठिकाणी उगवून त्यांचे अवशेष जसे कि पाने, फांद्या इत्यादी आपल्या शेतात नेऊन तिथे जमिनीत मिसळतात किंवा गाडतात.

मुळावर गाठी असलेली डाळवर्गीय आणि गाठी नसलेली अशी दोन्ही प्रकारची पिके हिरवळीच्या खतासाठी वापरतात.  या दोन पिकांमधील प्रमुख फरक म्हणजे मुळावर गाठी असलेल्या पिकाद्वारे नत्र आणि सेंद्रिय पदार्थ जमिनीत घातले जातात तर मुळावर गाठी नसलेल्या पिकापासून फक्त सेंद्रिय पदार्थ जमिनीत  घातला जातो. 

हिरवळीच्या खतामध्ये फॉस्फरस वापरणे फायदेशीर ठरते. फॉस्फरस वनस्पतींच्या मुळांच्या वाढीस आणि ऊर्जेच्या संचयाला मदत करतो. हिरवळीचे खत मुख्यतः नायट्रोजनचे प्रमाण वाढवते, पण त्यात फॉस्फरस कमी असतो. त्यामुळे मातीमध्ये संतुलित पोषणासाठी फॉस्फरस देणे फायदेशीर ठरते त्यामुळे हिरवळीच्या खताची पेरणी करताना किंवा पेरणीनंतर लगेच फॉस्फरस खत सरासरी ५० ते ६० किलो प्रति हेक्टर जमिनीत मिसळून द्यावे, त्यामुळे मुळांची वाढ सुधारून सेंद्रिय द्रव्यांचे विघटन लवकर होते आणि हिरवळीच्या खतामुळे निर्माण होणारा ह्युमस अधिक परिणामकारक असल्यामुळे जमिनीचा पोत व जलधारण क्षमता सुधारते.

ऊस पिकामध्ये हिरवळीची पिके आंतरपीक म्हणून घेणेऊस पिकामध्ये हिरवळीची पिके आंतरपीक म्हणून घेणे ही एक अत्यंत फायदेशीर आणि शाश्वत शेतीची पद्धत आहे. यामुळे ऊस पिकाच्या वाढीस पूरक पर्यावरण तयार होते आणि मातीची गुणवत्ता टिकून राहते. ऊस लावल्यावर १० ते १५ दिवसांच्या आत हिरवळीचे पीक पेरावे. दोन ऊस ओळींत मधोमध हिरवळीच्या खताचे बी पेरावे. योग्य अंतर ठेवून, उगवण होईपर्यंत हलकी मशागत करावी आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना गाडावे हे सर्व करीत असताना ऊसाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.ऊस पिकामध्ये हिरवळीची पिके आंतरपीक म्हणून घेण्याचे फायदे

फायदा - स्पष्टीकरण

  • नायट्रोजनचा नैसर्गिक पुरवठा - डाळवर्गीय हिरवळीची पिके (धैंचा,ताग, गवार) जमिनीत नायट्रोजन स्थिर करतात, जे ऊसाच्या गरजेस पूरक ठरते.
  • मातीची धूप व वाऱ्यापासून संरक्षण    - आंतरपीकामुळे जमिनीचा पृष्ठभाग झाकलेला राहतो, त्यामुळे मातीची धूप कमी होते. 

तण नियंत्रण - तणांची वाढ कमी होते.सूक्ष्मजीवांची क्रिया वाढवते - मातीतील सेंद्रिय घटक वाढल्याने लाभदायक सूक्ष्मजीवांची संख्या वाढते.मातीचा पोत आणि पाणी धारण क्षमता सुधारते - हिरवळीची पाने, मुळे आणि सेंद्रिय घटक मुळे माती अधिक भुसभुशीत होते.

हिरवळीची खते कुजण्याची क्रिया हिरवळीचे पीक ४५ ते ६० दिवसांचे झाल्यानंतर या अवस्थेत वनस्पतीत भरपूर नायट्रोजन, साखरेचे संयुगे आणि पाणी असते त्यामुळे ते ट्रॅक्टर किंवा कुळवाने जमिनीत गाडल्यानंतर त्याच्यावर जमिनीतील बॅक्टेरिया व बुरशी कार्य करतात. साधारणतः १५ ते २५ दिवसांमध्ये हिरवळीचे पीक कुजून जाते. वातावरणातील ओलावा, उष्णता आणि जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या यावर कुजण्याची क्रिया अवलंबून असते. साधारणपणे २५-३५ डिग्री सेल्सियस तापमान, पिकाची कोवळी अवस्था आणि ओलावा असल्यास कुजण्याची क्रिया जलद होते. हिरवळीच्या खतामध्ये कार्बन: नत्र प्रमाण हे १६:१ असे असल्यामुळे कुजण्याची प्रक्रिया लवकर होते.  

जमिनीत असलेले सूक्ष्मजीव हिरवळीच्या पिकातील कार्बन व नायट्रोजनयुक्त पदार्थांचे विघटन करतात. त्यामुळे वनस्पतीतील सिंपल कार्बोहायड्रेट्स व प्रथिने वेगाने विघटीत होतात आणि कार्बन डायऑक्साईड आणि उष्णता निर्माण होते. सूक्ष्मजीव सेल्युलोज, लिग्निन, प्रथिनांचे विघटन करतात. यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हळूहळू मोकळे होतात. पूर्ण विघटनानंतर ह्युमस तयार होतो त्यामुळे मातीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून मातीचा पोत सुधारतो, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि माती अधिक सुपीक होते.

हिरवळीचे खत जमिनीत गाडण्यास १५ ते २० दिवसाचा उशीर झाल्यास त्यामधील तंतुमय पदार्थ कठीण होतात तसेच त्यामधील नत्राचे प्रमाणही कमी होते त्यामुळे सूक्ष्मजीवांना हे खत विघटन करण्यास कठीण जाते आणि कुजण्यास विलंब लागतो.  हिरवळीचे खत उशिरा गाडल्यामुळे त्यामधील पॉलिथिनॉल रसायनाचे प्रमाण वाढते त्यामुळे जिवाणूंच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

हिरवळीच्या खतांचे जैविक व रासायनिक गुणधर्म

१) जैविक गुणधर्म १. जमिनीमध्ये जैविक सजीवांचे प्रमाण वाढते हिरवळीची खते मातीतील सूक्ष्मजैविकांची क्रियाशीलता वाढवतात. विशेषतः नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जिवाणूंची वाढ होते. मातीमध्ये जिवाणू, बुरशी, ऍक्टिनोमायसेट्स यांसारख्या सूक्ष्मजीवांची संख्या वाढते, जे पोषणद्रव्यांचे विघटन व पुनर्वितरण करतात.२. जैविक क्रियांना चालनाहिरवळीची खते मातीमध्ये विघटन होताना एंजाइम्सची निर्मिती करतात, ज्यामुळे पोषणद्रव्ये सहज उपलब्ध होतात.३. मातीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढतोसर्वात महत्वाचे म्हणजे ही हिरवळीची खते कार्बन स्रोत असतात. त्याचा थेट परिणाम सेंद्रिय कर्बाच्या पातळीवर होतो.

२. रासायनिक गुणधर्म 

  • नत्र चे प्रमाण विशेषतः कडधान्य गटातील हिरवळीची पिके रायझोबियम जिवाणूमुळे हवेतील नत्र मातीमध्ये स्थिर करतात. त्यामुळे मातीमध्ये नत्राचे प्रमाण वाढते.
  • हिरवळीच्या खतातील प्रथिने, कार्बोहायड्रेट्स व लिग्निन या घटकांचे विघटन होताना विविध पोषणद्रव्ये जसे कि नत्र, स्फुरद, पालाश, सल्फर, कॅलसियम, मॅग्नेशियम मुक्त होतात.
  • हिरवळीच्या खतामुळे मृदामधील आम्लता किंवा क्षारता नियंत्रित करण्यास मदत होते त्यामुळे सामू संतुलित राहून अन्नघटकांची कार्यक्षमता सुधारते. 
  • हिरवळीच्या खतामुळे मातीवर धनायन विनिमय क्षमता वाढते त्यामुळे कणांवर पोषणद्रव्ये अधिक काळ टिकून राहतात, जे झाडांसाठी उपयुक्त ठरते.
  • नत्रासोबत फॉस्फरस व पोटॅश यांसारखी पोषणद्रव्ये मृदामध्ये काही प्रमाणात उपलब्ध होतात, जरी प्रमाण रासायनिक खतांएवढे नसले तरीही नैसर्गिक संतुलन राखले जाते.

हिरवळीच्या खतांचे फायदे

  • हिरवळीची पिके (ताग, धैंचा, गवार) नायट्रोजन स्थिरीकरण करून मातीला नायट्रोजनचा पुरवठा करतात.
  • सेंद्रिय पदार्थाची मात्रा वाढते, त्यामुळे मातीचा पोत सुधारतो.
  • समस्यायुक्त जमिनीचा  सामु कमी होतो, अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते, सेंद्रिय कर्बाची वृद्धी होते.
  • हिरवळीच्या खतामुळे माती बारीक आणि सच्छिद्र बनते, त्यामुळे मातीची धारणशक्ती वाढते
  • सेंद्रिय पदार्थ मुळे जमिनीतील जैविक कार्बन चे प्रमाण वाढते, त्यामुळे माती सजीव राहते.
  • हिरवळीच्या पिकांद्वारे वाढीच्या अवस्थेत आणि कुजण्याच्या प्रक्रियेत फेनॉल्स, फ्लॅव्होनॉइड्स, टेरपिनॉइड्स आणि सेंद्रिय आम्ल अशी रसायने जमिनीत सोडली जातात, त्यामुळे तणांच्या उगवणीवर परिणाम होऊन त्यांचे नैसर्गिक नियंत्रण होते
  • हिरवळीची पिके (ताग, धैंचा) सुत्रकृमी आणि इतर मातीतील हानिकारक किडींना आटोक्यात ठेवतात.
  • हिरवळीच्या पिकांची मुळे माती घट्ट धरून ठेवतात, त्यामुळे मातीची धूप होत नाही.
  • कोणतेही रासायनिक घटक न वापरता सेंद्रिय मार्गाने मातीची सुपीकता वाढते त्यामुळे सेंद्रिय शेतीस हिरवळीचे खत योग्य नैसर्गिक पर्याय आहे..
  • रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी होतो कारण हिरवळीच्या खतामुळे नैसर्गिक नायट्रोजन मिळतो.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी