Join us
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक तंत्रज्ञानाने हरभरा शेती, दोन एकरांत 17 किलो बियाणे पेरले, हेक्टरी 40 क्विंटल उत्पादन आले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 14:53 IST

Harbhara Farming : या पद्धतीमुळे झाडांना भरपूर फांद्या फुटल्या, भरघोस फुलोरा आला आणि पीक अत्यंत जोमदार वाढले.

- राजू बांते नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास शेतीत उत्पादनक्षमतेची नवी दारे उघडू शकतात. ड्रीप सिंचन, मल्चिंग पेपर व सुधारित लागवड पद्धतीमुळे पाण्याची बचत, तणांचे नियंत्रण आणि पिकाची जोमदार वाढ साध्य होते. तंत्रज्ञानाच्या योग्य वापरातून कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवणे शक्य होते.

तालुक्यात हरभऱ्याची लागवड प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने केली जाते. त्यामुळे उत्पादन मर्यादित राहते. फुटाळा येथील शेतकरी रूपचंद भर्रे यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नवा प्रयोग केला. ड्रीप सिंचन व मल्चिंग पेपरवर बेड तयार करून टोकन पद्धतीने अण्णागिरी या हरभरा वाणाची लागवड दोन एकरात केली.

या पद्धतीमुळे झाडांना भरपूर फांद्या फुटल्या, भरघोस फुलोरा आला आणि पीक अत्यंत जोमदार वाढले. परिणामी हेक्टरी सुमारे ४० क्विंटल उत्पादन मिळाले. विशेष म्हणजे त्याच मल्चिंग पेपरवर यापूर्वी कोबी व मिरचीचे उत्पादन घेतल्यानंतर हरभऱ्याची लागवड करण्यात आली होती. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार विजय-विशाल वाणाचे हेक्टरी साधारण २० ते २२ क्विंटल उत्पादन अपेक्षित असते. 

मात्र ड्रीप-मल्चिंग व टोकन पद्धतीच्या वापरामुळे उत्पादन जवळपास दुप्पट मिळाले. दोन एकरांसाठी केवळ १७ किलो बियाणे वापरून अवघ्या ९० दिवसांत पीक तयार झाले. तालुका कृषी अधिकारी सुनील भडके, कृषी सेवक शरद देवतत्ते व आंधळगाव मंडळ अधिकारी तिरुचंद लांजेवार यांनी वेळोवेळी शेतावर भेट देत मार्गदर्शन केले. त्यांच्या सहकार्यामुळे हा प्रयोग यशस्वी ठरला. 

आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावड्रीप सिंचन, मल्चिंग पेपर आणि बेड पद्धतीमुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होतो, तणांचे प्रमाण कमी राहते. झाडांना योग्य पोषण मिळते. त्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते आणि उत्पादनात मोठी वाढ होते.

कमी खर्चात जास्त फायदादोन एकरासाठी फक्त १७ किलो बियाणे वापरून अवघ्या ९० दिवसांत हरभऱ्याचे पीक तयार झाले. पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी बियाणे, नियंत्रित पाणी आणि सुधारित व्यवस्थापनामुळे उत्पादन दुपटीने वाढले. त्यामुळे ही पद्धत शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्यास शेतीत उत्पादन दुप्पट होऊ शकते. फुटाळा येथील प्रयोग हे त्याचे उत्तम उदाहरण असून परिसरातील शेतकऱ्यांनीही ही पद्धत स्वीकारावी.- सुनील भडके, तालुका कृषी अधिकारी

नवीन तंत्रज्ञानावर विश्वास ठेवला. शेतीत चांगला बदल दिसला. कमी बियाण्यात व कमी पाण्यात भरघोस हरभरा मिळाला. आता इतर शेतकऱ्यांनीही ही पद्धत वापरावी. - रूपचंद भरें, शेतकरी फुटाळा

 

 

 हेही वाचा : नमो शेतकरी योजनेचा नमो शेतकरी योजनेचा आठवा हफ्त्याचा निधी आला, शासन निर्णय जारी, पैशांचं वाटप कधीपासून?

 

English
हिंदी सारांश
Web Title : Modern Technology Boosts Chickpea Yields: Farmer Achieves 40 Quintals Per Hectare

Web Summary : A farmer in Futala doubled chickpea production using drip irrigation, mulching, and innovative planting. Employing only 17 kg of seeds across two acres, he achieved 40 quintals per hectare in 90 days, guided by agricultural officials.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीरब्बी हंगाम