Join us

छत्रपती संभाजीनगरच्या शेतकरी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्रास सरकारची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 19:25 IST

इतर कोणत्याही प्रयोजनासाठी सदर जागेचा वापर करता येणार नाही असा आदेशही सरकारकडून देण्यात आला आहे. 

छत्रपती संभाजीनगर : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या सहकार्याने, सी.एस.आर फंडातून शेतकरी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव परभणी कृषि विद्यापीठाने विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या मान्यतेच्या अधीन राहून, कृषि परिषदेस सादर केला होता. सदर प्रस्तावास महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या कृषि परिषदेने १३जुलै २०२३ रोजी झालेल्या १११ व्या बैठकीत मान्यता प्रदान केली आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या कृषि तंत्र विद्यालय, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथील १५ एकर जमिनीवर, शेतकरी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी पंजाब नेशनल बँक व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्यात होणाऱ्या सामंजस्य कराराचा मसुदा, संदर्भ क्र.४ अन्वये, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या कार्यालयास केला होता. या मसुद्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

शेतकरी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी देण्यात येणारी जागा ही प्राधान्याने शेतकऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी वापर करण्यात यावी. इतर कोणत्याही प्रयोजनासाठी सदर जागेचा वापर करता येणार नाही असा आदेशही सरकारकडून देण्यात आला आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीविद्यापीठ