Join us
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा 'भारत' ब्रँडचा तांदूळ आता मिळणार २५ रुपये किलो!

By मुक्ता सरदेशमुख | Updated: December 27, 2023 16:00 IST

नाफेड आणि एनसीसीएफच्या भांडारांमधून ही होणार विक्री...

'भारत' ब्रँडच्या तांदळाला २५ रुपयात विकण्याचा निर्णय केंद्र सरकाने घेतला आहे.वाढलेल्या महागाईपासून सामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. इकोनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, नाफेड आणि एनसीसीएफच्या भांडारांमधून ही विक्री होणार आहे. 

याआधीच सरकार या ब्रँडच्या अंतर्गत आटा आणि डाळीं बाजारात आणल्या आहेत.केंद्र सरकारने तांदळाच्या वाढत्या किमतींच्या अनुषंगाने व्यापाऱ्यांना  इशारा दिला आहे. सरकार बासमती तांदूळ २५ रुपये किलोने विकणार असला तरी सध्या बासमतीचे भाव ५० वर पोहोचले आहेत. नोव्हेंबर महिन्यात अन्नधान्यांच्या वाढलेल्या किमतींवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने बासमती तांदळाची निर्यातही थांबवली होती. तसेच बाजारपेठेत तांदळाचा साठा वाढवण्यासाठी तांदळाची साठवण करून ठेवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचा इशाराही सरकारने दिला होता.

तांदूळ विक्रीला चालना देण्यासाठी अलीकडेच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने खुल्या बाजारपेठेत तांदूळ विकण्यासाठी  ओपन मार्केट सेल स्कीमचे (OMSS) नियम  केले आहेत. ज्याचा उद्देश बाजारपेठेतील तांदळाचा साठा वाढवणे आहे. भारतात एकूण अन्नधान्यापैकी ४० टक्क्यांपेक्षा अधिक भात घेतला जातो. जगातील तांदूळ निर्यातीच्या बाजारपेठेत भारत प्रमुख निर्यातदारांमध्ये गणला जातो. यंदा कमी झालेल्या पावसाने तांदळाचे क्षेत्र घटले आहे. सरकारच्या धान्य कोठारामध्ये सध्या ४७.२ मेट्रीक टन तांदळाचा साठा आहे. जो सामान्य साठ्याच्या साडेतीन पटीने कमी आहे. 

टॅग्स :भातबाजारमार्केट यार्ड