Join us

खरीप पीकविम्याचे ३,२६५ कोटी शासनाने केले मंजूर; 'या' जिल्ह्याला मिळाला सर्वाधिक निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 09:23 IST

Crop Insurance : यंदाच्या पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती, तसेच प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना ३ हजार २६५ कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

यंदाच्या पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती, तसेच प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना ३ हजार २६५ कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

आतापर्यंत २ हजार ५४६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून, उर्वरित ७१९ कोटी रुपये लवकरच संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येतील, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

यंदाच्या खरीप पीक विमा योजनेत एक रुपयात विमा उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्तीत राज्यातील शेतकऱ्यांना २ हजार ५५२ कोटी ६० लाख रुपये तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीपोटी ७१२ कोटी ७५ लाख रुपये, असे एकूण ३ हजार २६५ कोटी ३६ लाख रुपये राज्य सरकारने मंजूर केले आहेत.

यात सर्वाधिक १ हजार ४०४ कोटी १२ लाख रुपये एकट्या लातूर विभागात मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील ६९१ कोटी ३६ लाख रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून तर ७१२ कोटी ७५ लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीपोटी देण्यात येणार आहेत.

त्या खालोखाल ६२९ कोटी ४ लाख रुपये अमरावती विभागात शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. या विभागात स्थानिक आपत्तीतून झालेल्या नुकसानीपोटी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

प्रतिकूल परिस्थितीतून झालेल्या नुकसानीपोटी भरपाई

कृषी विभागाने आतापर्यंत २ हजार ५४६ कोटी ६ लाख रुपयांचे वितरण केले आहे त्यातील १ हजार ८४४ कोटी ४४ लाख रुपये स्थानिक आपत्तीत झालेल्या नुकसानीपोटी तर ७०१ कोटी ६२ लाख रुपयांची नुकसानभरपाई हंगामातील प्रतिकूल परिस्थितीतून झालेल्या नुकसानीपोटी देण्यात आली आहे. तर, उर्वरित ७१९ कोटी २९ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम वितरित करण्याचे काम सुरू आहे. लवकरच उर्वरित रक्कमही संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. - विनयकुमार आवटे, कृषी संचालक, पुणे.

विभागनिहाय एकूण

▪ मंजूर नुकसानभरपाई - ३२६५.३६▪ वितरण - २५४६.०६▪ शिल्लक (कोटींत) - ७१९.२९

 मंजूर नुकसानभरपाईवितरणशिल्लक (कोटींत)
नाशिक १४९.८८ १०२.७२ ४७.१५ 
पुणे २८२.९९ १३३.५५ १६९.४४  
कोल्हापूर १५.४९ ९.६७ ५.८२ 
छत्रपती संभाजीनगर ५६४.१८ ४०४.११ १६०.०७ 
लातूर १४०४.१२ १२६३.३५ १४०.७६ 
अमरावती ६२९.०४ ४३३.३६ १९५.६८ 
नागपूर २१९.६३ २१९.२८ ३५.०१ 

हेही वाचा : शेतकरी बांधवांनो 'हे' सोपे उपाय येतील कामी; हृदयाविकाराची सुटेल चिंता सारी

टॅग्स :पीक विमाशेतकरीशेतीशेती क्षेत्रपीकसरकार