Join us

Mango Festival : पुणेकरांसाठी खूशखबर! चार ठिकाणी आंबा महोत्सवाचे आयोजन! थेट शेतकऱ्यांकडून करा हापूसची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 19:39 IST

पणन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी बैठक घेऊन राज्यातील आंबा उत्पादकांना थेट विक्री करता यावी यासाठी राज्यात विविध भागात आंबा महोत्सवांचे आयोजन करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत.

Pune : राज्यातील आंबा उत्पादकांना मार्केट उपलब्ध व्हावे आणि शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना आंबा विक्री करता यावा यासाठी महाराष्ट्र राज्य पणन मंडळाकडून दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. पण यंदा पुणेकरांसाठी पणन मंडळाने चार ठिकाणी आंबा महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन केले आहे.

पणन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी बैठक घेऊन राज्यातील आंबा उत्पादकांना थेट विक्री करता यावी यासाठी राज्यात विविध भागात आंबा महोत्सवांचे आयोजन करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत. आंबा विक्री वस्थेमधील मध्यस्थ वगळून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा आंबा मिळावा या उद्देशाने उत्पादक ते थेट ग्राहक कल्पनेनुसार महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी पणन मंडळाच्या आंबा महोत्सवाचे सलग २४वे वर्ष आहे.

यंदा १ एप्रिलपासून ३१ मे २०२५ या कालावधीत ‘आंबा महोत्सव-२०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. कृषी पणन मंडळ आणि पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मार्केटयार्ड, गांधी भवन (कोथरूड), मगरपट्टा-हडपसर आणि खराडी या चार ठिकाणी आंबा महोत्सव भरवण्यात आला आहे.

या महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या कोकणातील पाच जिल्ह्यातील भोगोलिक मानांकन (Geographical Indication-GI) मिळालेला हापूस आंबा तसेच राज्यातील केशर, पायरी तसेच इतर वाणांचा आंबा उपलब्ध होणार आहे. कोकणातल्या हापूसच्या नावावर परराज्यातून आलेल्या आंब्याची सर्रास विक्री होते. त्यामुळे कोकणच्या हापूसचं नाव बदनाम होत आहे. पण आता जीआय मानांकनामुळे हापूसच्या नावे होणारी फसवणूक टाळली जाणार आहे. 

ही बाब विचारात घेऊन, कृषि पणन मंडळामार्फत आयोजित आंबा महोत्सवात देखील जीआय मानांकन प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक श्री.संजय कदम यांनी सांगितले. या महोत्सवामध्ये मार्केटयार्ड येथे ६० स्टॉल तसेच गांधी भवन-कोथरूड, मगरपट्टा-हडपसर आणि खराडी या ठिकाणी प्रत्येकी २० असे एकूण १२० स्टॉल्सद्वारे आंब्याची विक्री व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे शहराच्या विविध भागातील ग्राहकांची सोय होणार आहे.

 

टॅग्स :आंबापुणे