Join us

Ginger Research Center: अद्रक संशोधन केंद्र सात वर्षांनंतरही कागदावरच; जाणून घ्या काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:50 IST

Ginger Research Center : शेतकरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अद्रकचे उत्पादन घेतात. या वाणाचे अधिकाधिक संशोधन व्हावे आणि शेतकऱ्यांना सुधारित वाण मिळावे, यासाठी अद्रक संशोधन केंद्राची (Ginger Research Center) उभारणी करण्यात येणार आहे. जाणून घ्या सविस्तर

बापू सोळंके

छत्रपती संभाजीनगर : शेतकरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अद्रकचे उत्पादन घेतात. या वाणाचे अधिकाधिक संशोधन व्हावे आणि शेतकऱ्यांना सुधारित वाण मिळावे, यासाठी ७ वर्षापूर्वी खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे अद्रक संशोधन केंद्र (Ginger Research Center) उभारण्याची घोषणा करण्यात आली होती.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामार्फत हे केंद्र उभारण्यात येणार होते. मात्र, विधिमंडळात कृषिमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतरही मागील सात वर्षे अद्रक संशोधन केंद्र (Ginger Research Center) कागदावरच आहे.

जिल्ह्यातील खुलताबाद, कन्नड, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर आणि फुलंब्री तालुक्यात अद्रकची लागवड मोठ्या प्रमाणात होते. यामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या जीवनात सुखसंपदा आली आहे. मात्र, बऱ्याचदा अद्रकला दर न मिळाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होते. या पार्श्वभूमीवर खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे अद्रक संशोधन केंद्र उभारण्याचा निर्णय शासनाने सात वर्षापूर्वी घेतला होता.

अद्रक संशोधन केंद्रासाठी (Ginger Research Center) किमान १०० एकर जमिनीची आवश्यकता असते. आमदार सतीश चव्हाण यांनी याबाबत विधिमंडळात अनेकदा प्रश्न उपस्थित केला. प्रत्येक वेळी तत्कालीन कृषिमंत्र्यांनी तो मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही हे केंद्र कागदावरच असल्याचे दिसून येते.

सिल्लोड येथे मका संशोधन केंद्राचे काम प्रगतिपथावर

* परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर उपकेंद्रांतर्गत सिल्लोड येथे मका संशोधन केंद्र उभारण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी झाला.

* यानंतर सिल्लोड येथे यासाठी जमीन उपलब्ध करण्यात आली. या केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे. मात्र, या केंद्रासाठी पदनिर्मिती अद्याप करण्यात आलेली नाही.

इसारवाडीत मोसंबी संशोधन केंद्राची इमारत पूर्णत्वाकडे

* छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील मोसंबी बागांचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पैठण तालुक्यातील इसारवाडी येथे मोसंबी संशोधन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय कृषी विभागाने दोन वर्षापूर्वी घेतला.

* या केंद्राच्या इमारतीचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. पुढील सहा महिन्यांत हे बांधकाम पूर्ण होईल. या केंद्रासाठी मात्र स्वतंत्र पदनिर्मिती अद्याप करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात कार्यरत कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार देऊन हे केंद्र चालविण्याचा विचार वरिष्ठ अधिकारी करीत आहेत.

* १०० एकर जागेची अद्रक संशोधन केंद्राला गरज आहे. ती जागा देण्याचे सरकारचे फक्त आश्वासन.

हे ही वाचा सविस्तर: Mosambi Research Center: इसारवाडी मोसंबी संशोधन केंद्र शेतकऱ्यांना ठरणार वरदान वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसंशोधनशेतकरीशेतीपीक