Join us

हळदीचा उतारा पुढीलवर्षी चांगला येण्याकरीता; बेणे सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 9:49 AM

थंडावा मिळावा यासाठी गोळा करू लागले लिंबाचे डहाळे

नगदी पीक असलेल्या हळदीचा उतारा पुढीलवर्षी चांगला यावा, म्हणून शेतकरी वर्ग हळदीचे बेणे सुरक्षित कसे राहतील, याकडे लक्ष देऊ लागले आहेत. यासाठी कडुलिंबाचा पाला गोळा करून त्यात बेण्याला लपेटून ठेवू लागले आहेत.

गत दोन वर्षांपासून हळद पीक शेतकऱ्यांना चांगली साथ देऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांचा कलही हळद पीक घेण्याकडे वळला आहे. यावर्षी हिंगोली जिल्ह्यातील सवड, राहोली (बु), राहोली (खुर्द), रामा देवूळगाव, केसापूर, वरुड गवळी, घोटा देवी आदी गावांतील शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली होती. सद्यःस्थितीत काही शेतकऱ्यांची हळद काढणी पूर्ण झाली असून, अजून काही शेतकरी हळदीची काढणी करत आहेत.

सद्यःस्थितीत हळदीला १३ ते १६ हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. खरे पाहिले तर नगदी पीक असलेल्या हळदीला २० ते २५ हजार रुपये क्विंटल भाव शासनाने द्यायला पाहिजे, परंतु शासन शेतकऱ्यांच्या कष्टाचे चिज करत नाही, म्हणून शेतकऱ्यांना हळद पिकाच्या लागवडीसाठी उसनवारी करावी लागत आहे.

यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले, तरी शेतकऱ्यांनी हळद पिकाची लागवड केली. रात्रंदिवस शेतात राबून हळदीची जोपासना केली व हळदीचे पीक घेतले, परंतु हळद बाजारात आणली तर त्यात अनेक व्यापारी त्रुटी काढू लागले आहेत. हळद भिजली आहे, हळद काळी पडली आहे, अशा एक ना अनेक त्रुटी काढून भावही कमी देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नगदी पीक असलेल्या हळदीला हमी भाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

हळद बेणे सुरक्षित ठेवण्यासाठी लगबग

यावर्षी हळदीचे उत्पन्न म्हणावे तसे झाले नाही, पण पुढीलवर्षी उत्पन्न चांगले होईल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी हळदीचे बेणे लिंबाच्या पानांमध्ये गुंडाळून ठेवणे सुरू केले आहे. हळद उष्णतेमुळे वाळून जाऊ नये, म्हणून त्यावर मातीचा लेपही चढविला जात आहे. काही शेतकरी या बेण्यांवर शेणाचाही लेप देत आहेत.

हेही वाचा - शेतकरी बांधवांनो भूक मंदावली, थकवा जाणवतोय; किडनीचा आजार तर जडला नाही ना?

हळदीला हमीभाव मिळणार तरी कधी

हरभरा, कापूस, तूर आदी पिकांना शासनाचा हमीभाव आहे, परंतु हळद नगदी पीक असूनही त्यास हमीभाव नाही. हळदीला हमीभाव द्यावा, अशी मागणी अनेक शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे, परंतु शासन मात्र यावर काहीच विचार करत नाही. - सदाशिव तारे, शेतकरी

हळद बाजारात आणली की, व्यापाऱ्यांची मनधरणी करावी लागत आहे. अशावेळी व्यापारी वर्ग शेतकऱ्यांची लूटच करतात. पड्या भावाने हळद शेतकऱ्यांकडून विकत घेतात. उसनवारी फेडायची असते, म्हणून शेतकरीही पड्या भावाने हळद विक्री करतो. यासाठी शासनाच्या हमीभावाची गरज आहे. - हनुमान पडोळे, शेतकरी

महागाईमुळे शेती करणे सध्या परवडत नाही. हळदीची लागवड करणे हे काही साधे काम नाही. रात्रंदिवस शेतात राबावे लागते. हळदीची लागवड व काढणीसाठी मजुरांना विनंती करावी लागते. याकरिता शासनाने विचार करून हळदीला हमीभाव द्यावा. - प्रकाश जोजार, शेतकरी

टॅग्स :पीकशेतीशेतकरीपीक व्यवस्थापनहिंगोली