Join us

अखेर बिबट्याची हार; तिने पकडली बिबट्याची शेपटी अन् वाचवले पाच वर्षीय चिमुकल्याचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 17:16 IST

सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक माता धाडस दाखवून आपल्या चिमुकल्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवीत होती.

सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक माता धाडस दाखवून आपल्या चिमुकल्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवीत होती.

जिवाच्या आकांताने बिबट्याच्या मागे धावत, त्याची शेपटी पकडून झुंज देत राहिली. अखेर तिच्या धाडसासमोर बिबट्याने हात टेकले आणि पाच वर्षीय चिमुकल्याला सोडून बिबट्याने धूम ठोकली.

ही थरारक घटना कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथे घडली. जखमी चिमुकल्यावर कोपरगावात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले आहे.

कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर गावात मंगळवारी सायंकाळी पवार यांच्या अंगणात पाच वर्षीय दिव्यांश खेळत होता. त्याच वेळी त्याच्यावर बिबट्याने झडप घातली.

बिबट्या दिव्यांशला ओढत शेतात घेऊन जात होता. त्याचवेळी आई मंदाबाई पवार यांना मुलाचा आवाज आला. क्षणाचाही विचार न करता त्या थेट बिबट्याच्या मागे धावत गेल्या. त्याची शेपटी पकडून जिवाच्या आकांताने ओढू लागल्या.

त्यांच्या धाडसापुढे बिबट्याचे काही चालले नाही. त्यांच्या तावडीतून दिव्यांश सुटला. आईच्या धाडसापुढे बिबट्याला हार मानावी लागली. जखमी अवस्थेत दिव्यांशला तत्काळ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यानंतर पुढील उपचारासाठी त्याला अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. यावेळी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या मदतीने त्याला वेळेत नगरला पोहोचविण्यात आले. कोपरगाव शहर व तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याचा वावर आहे. पाळी प्राण्यांवर हल्ले होत आहे. वनविभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.

गावकऱ्यांनी केले शौर्याचे कौतुकगावकऱ्यांनी मंदाबाईंच्या शौर्याचे कौतुक केले. उपसरपंच श्याम संवत्सरकर, माजी सरपंच कैलास संवत्सरकर, दत्ता संवत्सरकर आणि ग्रामसेवक अविनाश पगारे यांनी पुढाकार घेत या गरीब कुटुंबाला मदत केली.

अधिक वाचा: जमीन मोजणीसाठी आता वाट पाहू नका; 'ह्या' नवीन प्रणालीने मोजणी होणार फक्त ३० दिवसांत

English
हिंदी सारांश
Web Title : Mother saves child from leopard's jaws in Kopargaon bravery.

Web Summary : A mother in Shinganapur, Kopargaon, bravely rescued her five-year-old son from a leopard by grabbing its tail. The injured child is now receiving treatment. Villagers lauded the mother's courage and provided assistance to the family after the incident, which highlighted leopard activity in the area.
टॅग्स :बिबट्याजंगलमहिलाअहिल्यानगरकोपरगाव