Join us
Daily Top 2Weekly Top 5

कृषि विज्ञान केंद्र, परभणी तर्फे कापूस पिकातील प्रक्षेत्र दिन साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 12:05 IST

भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपुर कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०७ ते ०९ नोव्हेंबर २०२३ दरम्यान मौजे. पिंपळा ता. मानवत, मौजे. रेणाखळी ता. पाथरी व मौजे. धर्मापुरी ता. परभणी येथे प्रक्षेत्र दिन व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन

भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपुर कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०७ ते ०९ नोव्हेंबर २०२३ दरम्यान मौजे. पिंपळा ता. मानवत, मौजे. रेणाखळी ता. पाथरी व मौजे. धर्मापुरी ता. परभणी येथे प्रक्षेत्र दिन व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. मराठवाड्यातील प्रमुख पिक असणाऱ्या कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार मार्फत विशेष कापूस प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात व तामिळनाडु या राज्यांमध्ये राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्प अंतर्गत कापसाच्या उत्पादन वाढीसाठी कापूस लागवडीचे दादा लाड लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी या कार्यक्रमाचे कृषि विज्ञान केंद्र, परभणी तर्फे आयोजन करण्यात आले होते.

मौजे, पिंपळा ता. मानवत व मौजे. रेनाखळी ता. पाथरी येथे आयोजित केलेल्या प्रक्षेत्र दिनामध्ये डॉ. उषा सातपुते, तांत्रिक प्रशिक्षक, विशेष कापूस प्रकल्प, कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांनी कापूस पिकातील दादा लाड लागवड तंत्रज्ञांना विषयी सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांनी रासायनिक किटकनाशकांचा योग्य प्रकारे व शिफारशी नुसारच वापर करावा, एकात्मिक किड व रोग नियंत्रणकरतांना जैविक व भौतीक पध्दतीचा ही वापर करावा असे आवाहन केले. त्याचप्रमाणे कापसावर आलेल्या दहिया व नव्याने आढळुन आलेल्या तंबाखुवरील विषाणुजन्य रोग या बाबत शेतकऱ्यांनाआवगत केले.

श्री. कुंडलिक खुपसे, तांत्रिक प्रशिक्षक, विशेष कापूस प्रकल्प, कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शेतकऱ्यांना सघन व अतीसघन कापूस पिकाच्या लागवड पध्दती बद्दल सविस्तर माहिती दिली. योग्य वाणाची निवड, माती परिक्षणावर आधारीत संतुलित खतांचा वापर व सघन लागवड पध्दतीमध्ये वाढ नियंत्रकाचा योग्य प्रकारे वापर या बद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून दादा लाड, भारतीय किसान संघाचे प्रांत संघटन मंत्री, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शरद गडाख, कुलगुरु डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला प्रदिप कच्छावे, राज्य नोडल अधिकारी, दादा लाड तंत्रज्ञान, डॉ. अनंत बडगुजर, सहाय्यक प्राध्यापक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व परभणी जिल्हयातील प्रतिष्ठित वकील मा. अॅड. अशोक सोनी हे मान्यवर उपस्थित होते.

सदरील प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये दादा लाड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये शेतकऱ्यांना कापूस पिकाच्या लागवड पध्दती बद्दल सविस्तर माहिती दिली. योग्य अंतर, गळ फांदी काढुन टाकणे, शेंडा खुडुन झाडांची उंची पारंपारीक पध्दतीपेक्षा कमी ठेवुन फळ फांदीला योग्य प्रकारे अन्नद्रव्य मिळाल्यामुळे बोंडाची संख्या व आकार वाढवुन उत्पादनात वाढ होईल या बद्दल मार्गदर्शन केले. तसेच डॉ. शरद गडाख यांनी दादा लाड तंत्रज्ञानाचा वापर करुन विकसित केलेल्या कापूस पिकाच्या प्रक्षेत्रावर असलेल्या कापूस पिकातील रोपांची संख्या, बोडांची संख्या, बोडांचा आकार आणि इतर बाबांची खात्री करुन समाधान व्यक्त केले.

त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानाच्या विस्तारासाठी सर्व कृषी निगडीत संस्था व कार्यालये यांना  प्रमाणात कार्य करावे लागेल जेणेकरुन दादा लाड तंत्रज्ञानाच्या वापराने कापसाचे उत्पादन मोठया प्रमाणात वाढवता येईल. सदरील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे कापूस उत्पादनात झालेल्या वाढी बद्दल समाधान व्यक्त केले. तसेच प्रत्येकाने आप आपले अनुभव विशद करुन मोल्यवान प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्या तर्फे राजेंद्र सोनी आणि शिवाजी शिंदे या प्रगतशिल शेतकऱ्यांचा यांचा उत्कृष्ट पीक परिस्थितीबद्दल सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमानंतर सर्व शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांनी दादा लाड कापूस लागवड प्रक्षेत्रावर भेटी दिल्या व शेतकऱ्यांनी पुढील हंगामात दादा लाड कापूस लागवड पध्दतीचा वापर करुन आपल्या उत्पादकतेमध्ये वाढ करावी असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अनंत बडगुजर तर आभार प्रदर्शन प्रदिप कच्छवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नामदेव काळे, विकास खोवे कृषि विज्ञान केंद्र, परभणी येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

टॅग्स :कापूसविद्यापीठरब्बीवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठअकोलापरभणीकृषी विज्ञान केंद्र