पुणे : राज्यात यंदा म्हणजेच २०२३-२४ च्या हंगामात पावसाने दडी मारल्याने बहुतांश भागात दुष्काळ आहे. तर पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांचे पीक नियोजन बिघडून अर्थकारण कोलमडले आहे. पण येत्या मान्सून हंगामात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. तर या खरिपासाठी राज्यात गरजेपेक्षा जास्त खतांचा साठा उपलब्ध असल्याची माहिती आहे.
दरम्यान, यंदा राज्यात खरिपासाठी ४८ लाख मेट्रीक टन खतांचे नियोजन असून केंद्र सरकारकडून ४५ लाख ५३ हजार मेट्रीक टन खताची मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी १३.७३ लाख मेट्रीक टन युरिया, ५ लाख मेट्रीक टन डीएपी, १.३० लाख मेट्रीक टन एमओपी, १८ लाख मेट्रीक टन संयुक्त खते आणि ७. ५० लाख मेट्रीक टन एसएसपी अशी एकूण ४५ लाख ५३ हजार मेट्रीक टन खताला मंजुरी मिळाली आहे.
केंद्र सरकारने नॅनो युरियाच्या वापराला प्रोत्साहन दिले असून यंदाच्या हंगामात महाराष्ट्र राज्याला २० लाख बॉटल्स नॅनो युरिया आणि १० लाख बॉटल्स नॅनो डीएपीसाठी मंजुरी दिली आहे. टप्प्याटप्प्याने ही खते महाराष्ट्र राज्यात उपलब्ध होणार असून कृषी विभागाच्या माहितीनुसार १९ एप्रिलपर्यंत राज्यात २६ लाख ७० हजार मेट्रीक टनांच्या खताची उपलब्धता होती.
खतांचा साठा जास्तराज्यात सध्या २६ लाख ७० हजार मेट्रीक टन खतांची उपलब्धता असून केंद्र सरकारने या हंगामासाठी ४५ लाख ५३ हजार मेट्रीक टन खतांचा कोटा मंजूर केला आहे. त्यामुळे खतांची उपलब्धता ही ७० लाख मेट्रीक टनाच्या वर जाणार आहे. तर राज्यातील मागील ३ वर्षांचा खतांचा सरासरी वापर विचारात घेतला तर ४१ लाख ८६ हजार मेट्रीक टन खताचा वापर झाला आहे.
कशी आहे खतांची उपलब्धता?
- युरिया - ८. १३ लाख मेट्रीक टन
- डीएपी - १.५२ लाख मेट्रीक टन
- एमओपी - ०.७६ लाख मेट्रीक टन
- संयुक्त खते - ११.५६ लाख मेट्रीक टन
- एसएसपी - ४.७१ लाख मेट्रीक टन