Join us

शेतकऱ्यांनो लेकीच्या नावाने पोस्टाच्या या योजनेत खाते उघडा होईल मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 11:16 AM

मुलींच्या भविष्यात खरोखरच समृद्धी आणणारी योजना

हिंगोली : भारतीय डाक विभागाद्वारे सुकन्या समृद्धी योजना ही एक लाभांश देणारी योजना मुलींसाठी राबवली जाते. ० ते १० वर्षे वयोगटातील लहान मुलींसाठी ही योजना आहे. जिल्ह्यात २०२३-२४ या वर्षात ३ हजार ७६४ मुलींचे खाते उघडण्यात आले आहेत.

सुकन्या समृद्धी योजना ही लहान मुलींच्या भविष्यात खरोखरच समृद्धी आणणारी योजना आहे. ० ते १० वर्षे वयोगटातील मुलींच्या भविष्यातील शिक्षण, लग्नकार्य, वैद्यकीय उपचार आदी महत्त्वपूर्ण कार्यासाठी या योजनेंतर्गत मिळणाऱ्या भरीव निधीचा उपयोग होऊ शकतो. वर्षाला २५० रुपये किमान रक्कम भरून या योजनेत सहभागी होता येते.

कमाल दीड लाखांपर्यंत योजनेच्या खात्यात रक्कम जमा करण्याची मुभा आहे. जिल्ह्यात सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत २०२३-२४ मध्ये ३ हजार ७६४ मुलींचे खाते उघडण्यात आले आहेत.

असे आहेत योजनेचे निकष

■ सुकन्या समृद्धी योजनेत सहभागी होण्यासाठी २५० रुपये भरून खाते सुरू करणे आवश्यक आहे. 

■ वर्षाला किमान २५० रुपये, तर कमाल दीड लाख रुपये जमा करता येतात.

■ हे खाते ० ते १० वर्षे वयोगटातील मुलींच्या आई- वडिलांना उघडता येते.

■ एका कुटुंबात फक्त दोन खाते सुरू करता येतात.

■ या योजनेंतर्गत निर्माण करण्यात आलेले खाते वयाच्या २१ व्या वर्षाला निकाली काढण्यात येते, तसेच मुलीच्या १८ वर्षे वयाला जमा खात्यातील ५० टक्के रक्कम शिक्षणासाठी काढता येते.

प्रत्येक डाक घरात सुविधा...

■ सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कोणत्याही डाक कार्यालयात किंवा बँक शाखेत उघडले जाऊ शकते.

■ या योजनेंतर्गत १० वर्षे किंवा त्याहून कमी वयाच्या मुलीच्या नावाने बँक किंवा पोस्टात सुकन्या समृद्धी खाते उघडता येते.

टॅग्स :पोस्ट ऑफिसशेतकरीशेतीसरकारी योजना