Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना आता टेंशन नाही; तारण योजनेत कर्जाची सुविधा उपलब्ध !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 14:48 IST

आर्थिक गरज भागविण्यासाठी शेतमाल तारण कर्ज योजना आहे. वाचा सविस्तर

खामगाव : सोयाबीनचे दर पडले असले तरी दिवाळीचा सण असल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षाही कमी दराने सोयाबीन विकावे लागत आहे. दुसरीकडे तातडीची आर्थिक गरज भागविण्यासाठी शेतमाल तारण कर्ज योजना आहे. 

परंतु जिल्ह्यात या योजनेला फारसा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही. शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल योग्य दरात विकता यावा, त्यांची पिळवणूक थांबावी, या उद्देशाने कृषी पणन मंडळ वर्ष १९९०-९१ पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबविली जात आहे. 

यंदाच्या हंगामात सोयाबीनचे दर पडले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना लागवड खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. तारण योजनेमुळे शेतकऱ्यांना आधार मिळतो. मात्र, तरीदेखील याकडे कल दिसत नाही.

काय आहे शेतमाल तारण कर्ज योजना ?

कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आल्यास योग्य भाव मिळत नाही किंवा मागणी कमी झाल्यानंतर शेतमालाचे दर पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशात शेतकऱ्यांना अपेक्षित दराच्या प्रतीक्षेची संधी देणारी योजना म्हणून शेतमाल तारण कर्ज योजनेकडे पाहिले जाते.

कोणत्या पिकांना लागू ?

शेतमाल तारण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी पिकवलेली तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, हरभरा, ज्वारी, बाजरी, मका, गहू आदी शेतमालांचा समावेश करण्यात आला.

वर्षाला सहा टक्के व्याज

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारण ठेवलेल्या अनुदान शेतमालाच्या एकूण किमतीच्या ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम सहा महिने कालावधीसाठी सहा टक्के व्याजदराने तारण कर्ज म्हणून देण्यात येते.

१८० दिवसांत करा परतफेड शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांचा शेतीमाल स्वीकारला जातो. व्यापाऱ्यांचा शेतीमाल या योजनेअंतर्गत स्वीकारला जात नाही. तारण कर्जाची मुदत १८० दिवस आहे. बाजार समितीकडून कृषी पणन मंडळास तीन टक्क्यांप्रमाणे कर्जाच्या व्याजाची परतफेड केली जाते.

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनकृषी योजनासरकारी योजना