अवकाळी पावसाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. यात भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र असे असतांनाही दुसरीकडे भाजीमंडीत देखील शेतकऱ्यांचा भाजीपाला व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दरात खरेदी झाला आहे. कवडीमोल दरात खरेदी केलेला भाजीपाला मात्र व्यापारी चढ्या दरात विकत आहे हे विशे. यातून शेतकरी लुटला जात असताना व्यापारी मालामाल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वाली कोण असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.
यावर्षी उन्हाळ्यात यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची लागवड केली. ओलिताची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनी काही प्रमाणात भाजीपाला लावला. बाजारात भाजीपाल्याची आवक होताच व्यापाऱ्यांनी भाज्यांचे दर पाडले आहेत.
नफेखोरीला लगामच नाही
भाजीपाल्याचे आयुष्य काही तासापुरतेच आहे. याशिवाय वाहतुकीसाठी प्रभावी साधन नाही, यामुळे शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याचा विचार करीत नाही. याच संधीचा फायदा घेत भाजीपाला विक्रेते व्यापारी बेलगाम नफा मिळवित आहेत.
वीज भारनियमनाचा फटका
वीज भारनियमनाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकवेळा वीज गुल झाल्यानंतर वायरमन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विलंब लावतात. याकाळात मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
अतिवृष्टीने झालेली नुकसान भरपाई कधी मिळणार
अतीवृष्टीने भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात पालक, सांभार, कांदा, मेथी, बारीक घोळ या पिकाला याचा मोठा फटका बसला. तर दुसरीकडे भाजीपाल्याचा बार गळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
शेतकऱ्यांच्या भाज्या स्वस्त | व्यापाऱ्यांकडे चौपट दर |
टमाटर | ८ रुपये किलो | टमाटर | ३० रुपये किलो |
वांगे | ५ रुपये किलो | वांगे | ३० रुपये किलो |
ढेमस | ८ रुपये किलो | ढेमस | ३० रुपये किलो |
भेंडी | २० रुपये किलो | भेंडी | ६० रुपये किलो |
कोबी | १० रुपये किलो | कोबी | ४० रुपये किलो |
शेतकरी म्हणतात, भाजीपाला काढून टाकतो
आम्ही मेहनत करून भाजीपाला पिकवायचा आणि व्यापाऱ्यांनी या शेतमालावर पाहीजे तितका नफा मिळवायचा हा प्रकार शेतकऱ्यांसाठी वेदनादायक आहे. आम्ही आता भाजीपाला लागवडच काढून टाकतो. यामुळे होणारे नुकसान टाळता येणार आहे. यातून खरिपाच्या पिकाचे नियोजन करता येईल. - प्रफुल्ल अरू, शेतकरी
शेतकऱ्यांचा मजुरीचा खर्चही निघेना
बाजारात भाजीचे दर मोठ्या प्रमाणात पडले आहेत. याचा लाभ केवळ व्यापाऱ्याला झाला आहे. भाजीपाल्यातून मजुरीचा खर्चही निघणे अवघड झाले आहे. भाजीपाला लागवड हा नुकसानदायक व्यवसाय झाला आहे. शेतकऱ्यांनी मेहनत घ्यायची, त्याचा मोबदलाही भाजी विक्री करून मिळत नसेल तर फायदा काय? - संजय सोनकर, शेतकरी
हेही वाचा - Organic Fertilizer गाजर गवतापासून या सोप्या पद्धतीने तयार करा दर्जेदार सेंद्रिय खत