Join us

Farmer Suicide : "शेतकऱ्यांसाठी सरकारंच आतंकवादी आहे; सरकारलाच का उध्वस्त करू नये?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 18:34 IST

महाराष्ट्रात आजही एका दिवसात ७ शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे केवळ इथल्या सरकारी धोरणामुळे होतंय. आमच्या शेतकऱ्यांसाठी सरकार हेच आतंकवादी आहे.

Pune : "पहलगाम येथे आतंकवाद्यांनी हल्ला केल्यानंतर केंद्र सरकारने त्या आतंकवाद्यांची घरं उध्वस्त केली. पण महाराष्ट्रात आजही एका दिवसात ७ शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे केवळ इथल्या सरकारी धोरणामुळे होतंय. आमच्या शेतकऱ्यांसाठी सरकार हेच आतंकवादी आहे. मग हे सरकार उध्वस्त का करू नये?" असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केला आहे. 

परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना येथील ३५ वर्षीय सचिन जाधव यांनी १३ एप्रिल रोजी विष पिऊन आत्महत्या केली आणि त्यापाठोपाठ पत्नी ज्योती जाधव हिनेही आत्महत्या केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे ज्योती या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. या शेतकरी दाम्पत्याच्या आत्महत्येमुळे त्यांच्या दोन लहान मुली पोरक्या झाल्या आहेत.

पोरक्या झालेल्या मुलींना २५ लाखांची आर्थिक मदत मिळावी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये वाढ व्हावी आणि इतर मागण्यांसाठी राजू शेट्टी यांनी आक्रोश पदयात्रा काढली आहे. माळसोन्ना गाव ते परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर ही पदयात्रा काढली आहे.

"सरकार एकीकडे पहलगाम दहशतवाद्यांची घरे उध्वस्त करतंय पण महाराष्ट्रात दररोज सात शेतकरी आत्महत्या करतायेत, त्याला जबाबदार हे सरकारच आहे. सरकारला शेतकरी आत्महत्या महत्त्वाच्या वाटत नाहीत का? सरकार हेच इथल्या शेतकऱ्यांसाठी आतंकवादी आहे, सरकारलाच उध्वस्त केलं पाहिजे" अशा तीव्र शब्दांतील भावना राजू शेट्टी यांनी लोकमत अॅग्रोशी बोलताना व्यक्त केल्या.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी