Join us

Farmer Success Story : नियोजन अन् श्रमांच्या जोरावर विजयरावांनी शेवंती शेतीतून लाखाची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 17:11 IST

Farmer Success Story :नियोजन अन् श्रमांच्या जोरावर विजयराव यांनी शेवंती शेतीतून लाखो रुपयांची कमाई करता येऊ शकते हे दाखवून दिले आहे. वाचा सविस्तर

युनूस नदाफ

पार्डी : दिवसेंदिवस शेती करणे अवघड होत चालली आहे. यात खत, बी-बियाणे, वीज, पाणी, मजुरी, अवकाळी पाऊस या समस्या शेतकऱ्यांसमोर आहेत. या सगळ्या संकटांवर मात करीत अर्धापूर तालुक्यातील शेणी येथील तरुण शेतकऱ्यांनी ३० गुंठ्यांत शेवंती फुल शेती करून २० दिवसांत दीड लाखाची कमाई केली आहे.

विजय धुमाळ असे या प्रयोगशील तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. विजय यांनी जून महिन्यात योग्य नियोजन करून ३० गुंठ्यांत शेवंती फुलांची लागवड केली होती. आज त्यांची फुल शेती फुलांनी बहरली आहे. मागील महिन्यात फुल तोडणीस सुरुवात झाली.

सुरुवातीला ३० गुंठ्यांत ४० ते ५० किलो फुल निघत होते, परंतु डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून याच शेतीमधून दोन क्विंटल फुलाचे उत्पन्न सुरू झाले आहे. या शेतकऱ्यांनी पौर्णिमा या व्हरायटीचे दोन कलरमध्ये फुलाची लागवड केली आहे. यात पांढरा आणि पर्पल कलरची लागवड केली.

सध्या बाजारपेठेत चांगली मागणी आहे. या कलरच्या फुलाला बाजारपेठेमध्ये ६० ते ७० रुपये किलो दर मिळत आहे. चांगला दर मिळत असल्याने मागील २० दिवसांत दीड लाखाचे उत्पादन मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

अर्धापूर तालुक्यातील बहुतांशी शेतकरी केळी, ऊस, हळद, कापूस व सोयाबीन यासारखे पारंपरिक पिके घेतात. इसापूर धरणाच्या पाण्यावर संपूर्ण तालुका ओलीताखाली आल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात केळी पिकाची लागवड करतात. मात्र, तरुण शेतकरी विजय धुमाळ यांनी ३० गुंठ्यांत नवीन प्रयोग करून शेवंती फुलशेती केली असून, या शेतीमधून त्यांच्या संसाराला भक्कम आधार मिळाला आहे.

फुलशेतीसाठी नियोजन अन् श्रमांची गरज

सध्या व्यापारी पद्धतीने शेती करावी लागणार आहे. बाजारात कशाला मागणी आहे, तेच पिकवावे लागते. नियोजन व कष्टाची तयारी असेल तर शेती अवघड नाही. आजच्या तरुणांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. कष्ट आणि विक्रीचे योग्य नियोजन केल्यास फुलशेती परवडणारी आहे. अगदी कमी क्षेत्रात देखील फुलांचे चांगले उत्पादन घेऊन चांगले उत्पन्न मिळू शकते. - विजय धुमाळ, तरुण शेतकरी

हे ही वाचा सविस्तर : Farmer Success Story : आष्ट्यातील युवा शेतकरी प्रणव २५ गुंठे मिरचीतून काढतोय चार लाखांचे उत्पन्न

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीफुलशेतीफुलं