जगभरातील जवळपास ५० देशांना भारतामधून आंबा निर्यात होतो. युरोप, ऑस्ट्रेलियासह अमेरिकेला केसर आंब्याची सर्वाधिक भुरळ पडत आहे. आखाती देश हापूस आंब्याला पहिली पसंती देत आहेत. गतवर्षी जगभर ३२,१०४ टन आंबा निर्यात होऊन ४९५ कोटींची उलाढाल झाली होती. यावर्षीही निर्यात वाढत असून, वाशीतील पणन मंडळाच्या केंद्रातून ४५ दिवसांमध्ये २१२८ टन आंबा निर्यात झाला आहे.
जगात सर्वाधिक आंब्याचे उत्पादन भारतामध्ये होते. गतवर्षी जवळपास २ कोटी २३ लाख टन आंबा उत्पादन झाले होते. देशांतर्गत बाजारपेठेबरोबर मागील काही वर्षापासून जागतिक बाजारपेठेमध्येही भारतीय आंब्याला मागणी वाढत आहे. काही वर्षापूर्वी युरोप व अमेरिकन देशांनी कीटकनाशकांच्या मुद्यावरून भारतीय आंब्यावर बंद घातली होती.
यामुळे सरकारने देशात विविध ठिकाणी विकिरण सुविधा उपलब्ध करून दिली आणि पुन्हा युरोप अमेरिकेमध्येही वेगाने निर्यात सुरू झाली आहे. यासाठी आवश्यक आयएफसी, व्हीएचटी व व्हीपीएफ प्रक्रिया करण्याची केंद्र ठिकठिकाणी सुरू केली आहेत. भारतीय आंब्याची सर्वाधिक विक्री आखाती देशांमध्ये होते. एकूण निर्यातीपैकी ४७ टक्के निर्यात फक्त 'यूएई' मध्ये होते.
आखाती देशांमध्ये निर्यात होणाऱ्या आंब्यामध्ये हापूसचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. हापूसचा गोडवा या देशांमधील ग्राहकांना आवडत असल्यामुळे मुंबईमधून मोठ्या प्रमाणात हापूस आखाती देशांमध्ये निर्यात केला जात आहे. अमेरिका, ऑस्ट्रिलेया, जपान, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया व युरोपीयन देशांमध्ये हापूसपेक्षा केसरला सर्वांत जास्त पसंती मिळत आहे.
या देशांमध्ये आंबा पाठविताना करण्यात येणाऱ्या प्रक्रियेमध्ये हापूस फारकाळ टिकत नाही. केसर या प्रक्रियांसाठी साथ देत असल्यामुळे त्याची निर्यात जास्त होत आहे. गतवर्षी १९२ टन केसर व फक्त ७० टन हापूस युरोप व अमेरिकन देशांमध्ये निर्यात केला होता. यावर्षीही केसरने आघाडी घेतली आहे.
४५ दिवसांमध्ये २१२८ टन निर्यात
• युरोप व अमेरिकेमधील निर्यात यावर्षी १ एप्रिलपासून सुरू झाली आहे. यंदा चार हजार टन निर्यात करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
• महाराष्ट्र, गुजरात व दक्षिणेकडील राज्यांमधील ५० पेक्षा जास्त निर्यातदार पणन मंडळाच्या नवी मुंबई केंद्रातून आंबा निर्यात करत असून ४५ दिवसांमध्ये २१२८ टन आंबा निर्यात करण्यात यश आले आहे.
• सर्वाधिक १३५० टन निर्यात अमेरिकेमध्ये केली आहे. अमेरिकेचे अन्न व औषध विभागाचे निरीक्षक नवी मुंबईत आले असून, आयएफसी प्रक्रिया केलेल्या मालाची तपासणी करूनच माल पाठविला जात आहे.
पणन मंडळाच्या केंद्रातून यावर्षीची निर्यात
देश | निर्यात (टन) |
अमेरिका | १३५० |
ऑस्ट्रेलिया | २०.६५ |
जपान | ५.८७६ |
न्यूझीलंड | ३०.८४२ |
इतर युरोपियन देश | ५३७.९८५ |
युके | १८२.६६३ |
एकूण | २१२८ |
गतवर्षी आंबा प्रकाराप्रमाणे निर्यात
प्रकार | निर्यात (टन) |
हापूस | ७०.२५४ |
केसर | १९२.८०३ |
बेगनपल्ली | ४५.९६ |
तोतापुरी | ०.८५७ |
लंगडा | ७.७६२ |
चौसा | ३.४९७ |
मल्लिका | १.४८२ |
नीलम | ०.३४६ |
हिमायत | २.१५ |
राजापुरी | ३.२४८ |
दशेरी | ३.७०७ |
रसालू | ०.२८७ |
गतवर्षीची सर्वाधिक निर्यात झालेले देश
देश | निर्यात (टन) | उलाढाल (कोटी) |
यूएई | १५३३६ | १८९ |
युके | ४७०६ | ९३.६३ |
यूएसए | २११३ | ८२.३३ |
कुवेत | ९६३ | २४ |
कतार | १३०४ | १७.७७ |
कॅनडा | ६९९ | १५.७३ |
ओमान | ९५९ | १४.४७ |
नेपाळ | ३१०६ | ८.९९ |
सिंगापूर | ३७६ | ८.६३ |
बहारीन | ४७३ | ५.९८ |
नामदेव मोरे उपमुख्य उपसंपादक