Join us

काळी हळद माहितीये का? फायदे ऐकून अवाक् व्हाल; हजार रूपये किलोने होतेय विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 00:45 IST

काळ्या रंगाची हळद जुन्या काळी जादुटोणासाठी वापरली जायची असा समज होता पण तीचे आरोग्यदायी फायदे जास्त आहेत. 

आपण सर्वांनीच घरातील पिवळ्या रंगाची हळद पाहिली असेल. हळदीचा रंगही पिवळाच असतो हे आपल्याला माहितीये पण बाजारात काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या हळदी उपलब्ध आहेत हे आपल्याला माहितीये का? पांढरी हळद आणि काळ्या रंगाची हळद ही आरोग्यासाठी फायद्याची असते. काळ्या रंगाची हळद जुन्या काळी जादुटोणासाठी वापरली जायची असा समज होता पण तीचे आरोग्यदायी फायदे जास्त आहेत. 

दरम्यान, काळी हळद ही कॅन्सरवर गुणकारी हळद म्हणून ओळखली जाते. या हळदीपासून इम्युनीटी बूस्टरसारखे औषधे तयार केले जातात. ही हळद बाजारात ३ ते ४ हजार रूपये किलोप्रमाणे विक्री केली जाते. तर पुण्यातील हिंजवडीजवळ असलेल्या बोडकेवाडी येथील ज्ञानेश्वर बोडके यांनी एका गुंठ्यात या हळदीची लागवड केली असून ते एक हजार रूपये किलोप्रमाणे या हळदीची विक्री करतात.

या हळदीची लागवड केल्यानंतर सहा ते सात महिन्यात या हळदीची काढणी होते. पण हळद काढल्यानंतर जमीनीमध्ये एक कंद तसाच ठेवला तर त्या कंदाला पुन्हा हळद येते. पुन्हा सहा महिन्याने हळदीची काढणी करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा लागवडीचा खर्च न होता दुहेरी फायदा होतो. या औषधी हळदीची लागवड केल्यास शेतकऱ्यांनाही चांगले अर्थार्जन होऊ शकते.

माहिती संदर्भ - ज्ञानेश्वर बोडके (शेतकरी, अभिनव फार्मर्स क्लब)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी