अयोध्याप्रसाद गावकरदेवगड : देवगड तालुक्यामधून यावर्षी आंबा कॅनिंगसाठी सुमारे २५ हजार टन आंबा रवाना झाला आहे. १ एप्रिलपासून आंबा कॅनिंग व्यवसाय तालुक्यामध्ये सुरू करण्यात आला होता.
सुरुवातीला प्रतिकिलो ५५ रुपये एवढा आंबा कॅनिंगला भाव होता. तर हाच दर प्रतिकिलो ४२ रुपयांवर येऊन स्थिरावला होता.
आंबा मोसमातील शेवटच्या टप्प्यातील म्हणजेच मे महिन्यामध्ये फळमाशीचा उद्रेक व पावसाचे सावट यामुळे ५ ते १५ मे दरम्यान मोठ्या प्रमाणात बागायतदारांनी आंबा कॅनिंगला आंबा दिला असल्याचे बोलले जात आहे.
यावर्षी देवगड हापूसचे उत्पादन सुमारे ३० टक्केच झाल्याचे काही बागायतदारांचे म्हणणे आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात हापूस आंबा कलमांना मोहोर आला होता.
मात्र या मोहोराला फळधारणा खूपच कमी असल्यामुळे व वांझ मोहोर जास्त प्रमाणात असल्यामुळे यावर्षीचे एकूण उत्पादन या कारणांमुळे कोलमडले गेले.
जानेवारी, फेब्रुवारी महिन्यामध्ये किरकोळ प्रमाणात आंबा कलमांना मोहोर आला होता. मार्च महिन्यामध्ये देवगड हापूस आंबा हंगामाला सुरुवात झाली.
यावर्षी कॅनिंग व्यवसाय धोक्यात असणार, असे वाटत असतानाच एप्रिल महिन्यामध्ये आंबा कॅनिंग व्यवसायाला सुरुवात झाल्यानंतर त्या व्यवसायाला गती मिळाली.
देवगड हापूसचा आमरस चवीमध्ये पहिल्या क्रमांकावर◼️ देवगड हापूसचा आमरस हा जगात चवीमध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचे गेल्या वर्षीच्या 'टेस्ट अॅक्ट लास्ट' या नामवंत ऑनलाइन फुड गाईडने जाहीर केले आहे.◼️ आंबा पल्प म्हणजेच आंबा आमरसाची चव, गुणवत्ता, लोकप्रियता या निकषावर जगातील दहा पदार्थांची निवड करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील देवगड हापूस आमरसाने प्रथम क्रमांक मिळविला आहे.
परदेशी पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी१) यावर्षी देखील आमरसासाठी मोठ्या प्रमाणात आंबा कॅनिंग व्यवसायाच्या माध्यमातून कंपन्यांमध्ये रवाना झाला आहे.२) देवगड तालुक्यामधील आमरस बनविण्याचे छोटे-मोठे उद्योग अनेक व्यापाऱ्यांनी उभारले असून या माध्यमातून हा आमरस देशभरात रवाना केला जात आहे.३) देवगड तालुक्यामध्येही पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. आंबा हंगाम संपल्यानंतरच जून महित्यापासून या आमरसाला मोठ्या प्रमाणात मागणी असते.४) मुंबईमधील नामांकित ताज हॉटेलमध्ये देवगड हापूस आंब्याचा आमरस विकला जातो आणि या आमरसाला परदेशी पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते.
देवगड तालुक्यामधून आंबा कॅनिंग व्यवसायाच्या माध्यमातून बाहेर जाणारा आंबा देवगडमध्येच मोठी कंपनी उभारून या ठिकाणीच आंबा पल्प बनविण्याची प्रक्रिया झाली तर येथील तरुणांना रोजगार व आंबा कॅनिंगला भाव देखील चांगला मिळू शकतो. वाहतुकीचा खर्च कमी होऊन आंबा कॅनिंगला भाव मिळू शकतो. यामुळे देवगड तालुक्यामधून आंबा कॅनिंगच्या माध्यमातून बाहेर जाणाऱ्या आंब्यावर देवगडमध्येच प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात उभारण्यात यावेत. - मंगेश गायकर, आंबा बागायतदार
अधिक वाचा: सरकारजमा झालेल्या या पाच हजार एकर जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर होणार; जाणून घ्या सविस्तर