Join us

चलन स्थिर : ग्रामीण भागात मंदीचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 9:30 AM

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था जवळपास शेतकऱ्यांवर अवलंबुन आहे. मात्र या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे व संतुलित नसलेल्या बाजारभावामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असल्याने आता बाजारपेठा थंडावल्या आहे.

रविंद्र शिऊरकर

वातावरणीय लहरीपणाचा बसलेला फटका, त्यात व्याजाने वाढत चाललेले डोक्यावरचे कर्ज, शेतमालाला असलेला कवडीमोल भाव अशा विविध कारणांमुळे सध्या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी सद्यस्थितीत आर्थिक संकटात सापडला आहे.

शासनाने पुढाकार घेऊन शेतीमालाला योग्य आणि स्थिर बाजारभाव द्यावे. जेणेकरुन शेतकऱ्यांना कुठेही हात पसरण्याची वेळ येणार नाही, अशी मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे.

खते, बी बियाण्यांचे भाव वाढले आहे. शेतीपूरक व्यवसायांची हि मोठी गळचेपी होत आहे. त्यात गत सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात असून, याचा थेट परिणाम आता ग्रामीण भागांतील बाजारपेठेत दिसून येत आहे. शेतीवर अवलंबून असणारे पूरक व्यवसायही काही महिन्यांपासून थंडावले आहेत. ज्यामुळे ग्रामीण बाजारपेठांमध्ये मंदीचे सावट असून, छोटे मोठे व्यावसायिक आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

चलन स्थिर झाल्याने आर्थिक व्यवहार ठप्प

खरेदी विक्री सुरू असली की, चलन फिरते असते ज्यात चढउतार सुरु असतात. बाजारपेठातील मोठा खरेदीदार हा शेतकरी आहे. या वर्षी पीक पाणी जेमतेम आहे सोबत उत्पन्न कमी झाल्याने आता शेतकरी बाजारपेठात येणे देखील टाळत आहे. परिणामी व्यावसायिकांवर देखील उपासमारीची वेळ आल्याचे व्यवसायदार सांगतात.

जेमतेम आर्थिक स्थिती असतांना देखील आपला व्यवसाय टिकविण्यासाठी अनेक छोट्या- मोठ्या व्यावसायिकांनी आपल्या वस्तू उधारीवर विक्री केल्या. मात्र आता उधारीवर विकलेल्या मालाचे पैसे देखील वसूल होतांना दिसून येत नाही. - विवेक शिवाजी जाधव (व्यावसायिक शिऊर ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर)

 

टॅग्स :ग्रामीण विकासशेतकरी आत्महत्या