Join us

Banana Cultivation : पुणे जिल्ह्यात यंदा केळीचे क्षेत्र १ हजार हेक्टरने वाढणार

By दत्ता लवांडे | Updated: September 8, 2025 19:43 IST

पुणे जिल्ह्यात पाच पिकांचे क्लस्टर तयार केले जात असून त्यामध्ये केळी या पिकाला सर्वांत जास्त पाठिंबा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Pune Banana Cultivation : पुण्यात पाच पिकांचे क्लस्टर तयार केले जाणार असून यावर्षीपासून म्हणजेच २०२५ च्या खरीप हंगामापासून याची तयारी कृषी विभागाकडून केली जात आहे. यामध्ये केळी, आंबा, सूर्यफूल, अंजीर, स्ट्रॉबेरी या पिकांचा सामावेश असून केळी या पिकाला सर्वांत जास्त प्रतिसाद शेतकऱ्यांकडून मिळताना दिसत आहे.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात दरवर्षी साधारणतः १ हजार ७०० ते १ हजार ९०० हेक्टर क्षेत्र केळी या पिकाखाली असते. पण यंदापासून हे क्षेत्र जवळपास ३ हजार हेक्टरवर जाण्याची शक्यता आहे. कारण क्लस्टर निर्मिती करण्याच्या हेतूने यावर्षी पुणे जिल्ह्यातील ७ तालुक्यातील १ हजार ४२० शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेंतर्गत १ हजार १३३ हेक्टरसाठी अनुदान देण्यात येणार आहे. 

पुणे जिल्ह्यात पाच पिकांच्या क्लस्टर निर्मिती कार्यक्रमांतर्गत केळी पिकाचे क्षेत्र हे २ हजार हेक्टरपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य कृषी विभागाचे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे होते. पण त्यातील जवळपास ५५ टक्क्यापर्यंत लक्ष्य पूर्ण झाले आहे. एकूण १ हजार ५३८ शेतकऱ्यांनी अर्ज केले असून या योजनेंतर्गत १ हजार ४२० शेतकऱ्यांना अनुदानाची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. 

दरम्यान, आंबा या पिकासाठीही शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून १ हजार ९२९ हेक्टरवरील आंब्याच्या लागवडीसाठी अनुदान येणार आहे. आंबा पिकाच्या क्लस्टरसाठी पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यातील २ हजार ४४ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. रोहयो फळबाग लागवड योजनेतून त्यातील १ हजार ९५० शेतकऱ्यांच्या अर्जाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

कृषी विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुणे जिल्ह्यात केळी, आंबा, सूर्यफूल, अंजीर, स्ट्रॉबेरी या पिकांसाठी क्लस्टर तयार करण्यात येत असून शेतकऱ्यांनी केळी, आंबा, सूर्यफूल या पिकाला चांगला प्रतिसाद दिला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील केळी पिकाचे क्षेत्र हे ३ हजार हेक्टरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच या पिकांच्या मार्केट, मूल्यवर्धन आणि विक्री व्यवस्थेसाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे.- संजय काचोळे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे)

टॅग्स :केळीपुणेशेतकरीशेती क्षेत्र