Join us

Crops on Pests, Caterpillars : शेतकरी पिकांवर कीड, अळ्यांच्या प्रादुर्भावाने चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 12:34 IST

Crops on Pests, Caterpillars : खरीप पिकांवर कीड व अळ्यांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे.

Crops on Pests, Caterpillars : 

रामदास घनतोडे :  यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहिले असले तरी खरीप पिकांवर कीड व अळ्यांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. विविध औषधांची फवारणी केली तरी रोगांचा नायनाट होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला असून कृषी विभाग याबाबत काय मार्गदर्शन करेल? याची वाट पाहत आहेत.

गेल्यावर्षी जून महिना अर्धाधिक कोरडाच गेला. त्यानंतर पावसाने थोडीशी साथ दिली. याच पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या उरकल्या. त्यानंतर जुलै व ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाला. पिकेही चांगली आली. परंतु काही पिके पावसाच्या पाण्यात वाहून गेली.

दुसरीकडे यावर्षी पाऊस चांगला झाला असला तरी पिकांवरील रोगांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे तर शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.

पावसाचे प्रमाण सुरुवातीपासून चांगले असल्यामुळे केंद्रासह, बटवाडी, मन्नास पिंपरी, वलाना, केंद्रा (खुर्द), ताकतोडा, गोधनखेडा, जामठी, कहाकर आदी गावांतील शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद व इतर खरीप पिकांची पेरणी केली आहे. परंतु सध्या अधून-मधून ढगाळ वातावरण राहत आहे.

त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर व इतर पिकांची पाने कीड व अळ्या खाऊन फस्त करत आहेत. अशावेळी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे. परंतु कृषी विभागाचा एकही कर्मचारी गावोगावी येऊन मार्गदर्शन करायला तयार नाही. 

संकट आले की सगळीकडूनच येते

मागीलवर्षी सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यानंतर दोन महिने पाऊस झाला. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. परंतु यावर्षी पिके चांगली असली तरी रोगाचे प्रमाण अधिक आहे.- शिव जामठीकर, शेतकरी

पिकांची उगवण सध्या चांगली आहे. परंतु, सोयाबीन व कापूस या पिकावर अळ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे उत्पन्न निघते की नाही, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.-अनिल डांगे केंद्रा बु., शेतकरी

शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा

दमट वातावरणामुळे खरीप हंगामातील पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. वेळीच कृषी विभागाशी संपर्क साधून कोणते औषध फवारावे, याबाबत माहिती जाणून घ्यावी. त्यानंतर सकाळ व दुपारच्या वेळी फवारणी करुन घ्यावी.- अनिल खिल्लारे, कृषी सहायक, केंद्रा बु

टॅग्स :शेती क्षेत्रकीड व रोग नियंत्रणशेतकरीशेती