Join us

Crop Insurance Scam : बोगस विमा प्रकरण; राज्यासह परराज्यातील ९६ सीएससीचे आयडी ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:27 IST

Crop insurance : भौगोलिक क्षेत्र नसलेल्या गावात अवैध पीक विमा भरणाऱ्या राज्यासह परराज्यातील ९६ सीएससी आयडी ब्लॉक करण्यात आले आहेत.

शिरीष शिंदे 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२४ मध्ये पीक विमा पोर्टलवर बोगस पद्धतीने विमा भरण्यात आला होता. भौगोलिक क्षेत्र नसलेल्या गावात अवैध पीक विमा भरणाऱ्या राज्यासह परराज्यातील ९६ सीएससी आयडी ब्लॉक करण्यात आले आहेत. यात बीड जिल्ह्यातील ३५, तर २२ जण हे माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळी मधील आहेत.

बीड जिल्ह्यातील शासकीय जमीन शेत दाखवून काहींनी बनावट पद्धतीने पीक विमा भरल्याचे प्रकरण 'लोकमत अॅग्रो' ने समोर आणले होते. त्यानंतर राज्यभरातील पीक विमा पडताळणीला सुरुवात झाली होती.

बीड जिल्ह्यासारखा प्रकार राज्यातील इतर जिल्ह्यातही आढळून आला होता. परभणी जिल्ह्यात खोटचा व बनावट कागदपत्रांद्वारे बोगस पीक विमा भरण्यात आला होता.

कोणतेही भौगोलिक क्षेत्र अस्तित्वात नसताना तेथे खोटे सातबारा, आठ-अ सारखे महसुली अभिलेख तयार करून एकूण ९६ सीएससी आयडीधारकांच्या आयडीमधून पीक विमा नोंदणी करून शासनाची फसवणूक करण्यात आली होती.

त्यामुळे सदरील ९६ सीएससी आयडी ब्लॉक करण्याच्या सूचना कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी सीएससी कंपनीला कळविले होते. त्यानुसार आयडी ब्लॉकची कारवाई करण्यात आली आहे.

३५ आयडी बीड जिल्ह्यातील

• बनावट पीक विमा भरणारे ३५ सीएससीधारक है बीड जिल्ह्यातील आहेत. त्यापैकी २२ जणांचे सीएससी आयडी हे परळी शहर व तालुक्यातील आहेत.

• उर्वरित अंबाजोगाईतील ६, बीडमधील १ व इतर ६ आयडीधारक हे इतर तालुक्यांतील असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

०७ आयड़ी इतर राज्यांतील

• महाराष्ट्रात बनावट पीक विमा भरणारे ७ सीएससीधारक हे इतर राज्यांतील आहेत.

• उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील २, बंदा जिल्ह्यातील अत्तारा येथील १, हरदोई जिल्ह्यातील २, तर हरयाणा राज्यातील रोहतक जिल्ह्यातील २ यांचा समावेश आहे.

विमा रद्दची कारवाई सुरू

• शासकीय जमीन अथवा बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने विमा भरल्याचे समोर आल्यानंतर सीएससीधारकांची आयडी ब्लॉक केली आहे. परंतु, या कारवाईपूर्वीच बनावट पीक विमा भरणाऱ्या लोकांचे विमा प्रस्ताव विमा कंपनीने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

• आतापर्यंत जवळपास १ लाखापेक्षा अधिक विमा प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत. आणखी काही बनावट प्रस्ताव रद्द केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : अहो ... सरपंच साहेब विसरू नका बरं; 'या' आहेत तुमच्या कामाच्या जबाबदारी

टॅग्स :पीक विमाशेतकरीशेतीबीडसरकारशेती क्षेत्र