Join us

Crop Insurance : मागच्या खरिपातील पीक विम्याची किती रक्कम विमा कंपनीकडे बाकी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 15:43 IST

बहुतांश पीक विम्याची रक्कम वाटप झाली असली तरीही अजून काही शेतकऱ्यांना या नुकसानीचे पैसे मिळालेले नाहीत.

Pune : मागच्या म्हणजेच २०२३ सालच्या खरीप हंगामात राज्यात दुष्काळशदृश्य परिस्थिती होती. अनेक तालुक्यांमध्ये आणि मंडळामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला होता. यामध्ये खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पण या नुकसानीचा पीक विमा अजूनही पूर्णपणे शेतकऱ्यांना मिळालेला नाही. बहुतांश पीक विम्याची रक्कम वाटप झाली असली तरीही अजून काही शेतकऱ्यांना या नुकसानीचे पैसे मिळालेले नाहीत.

दरम्यान, राज्य सरकारने एक रूपयांत पीक विमा ही योजना राबवल्यानंतर १ कोटी २० लाख २३ हजार शेतकऱ्यांनी पिक विम्यासाठी अर्ज केले होते. खरीपातील एकूण नुकसानभरपाईचा विचार करता ७ हजार ६३४ कोटी रूपयांची विमा रक्कम मंजूर करण्यात आली होती. त्यातील ७ हजार ४६५ कोटी ५९ लाख रूपयांची रक्कम वाटप करण्यात आली असून २६८ कोटी ४९ लाख रूपयांचा विमा अजूनही शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. 

यातील काही प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे यावरील निर्णय आल्यानंतर पैशांची वाटप केली जाणार आहे. यामध्ये प्रतिकुल हवामान घटकांमुळे पेरणी न होणे या बाबींकरता २२ लाख, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीसाठी १६ कोटी ८९ लाख, स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी १४३ कोटी ८८ लाख, काढणी पश्चात नुकसान भरपाई या बाबीसाठी ५२ कोटी आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित ५५ कोटी ४५ लाख रूपये पीक विमा देणे प्रलंबित आहे. 

२०२३ च्या खरीप हंगामाला एक वर्ष उलटून गेले तरीही पीक विम्याची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. अनेक महसूल मंडळातील विम्याचे दावे प्रलंबित असल्यामुळे त्यांचा निकाल लागेपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत अशी शक्यता आहे. 

टॅग्स :पीक विमाशेतकरीशेती क्षेत्र