Join us

Crop Insurance Fraud : राज्यात बोगस पीकविमा घोटाळ्याची चौकशी सुरू! कृषीमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 17:35 IST

बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या कृषक कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या कामाचं कौतुक केलं असून कृषी क्षेत्रातील विविध विषयांवर भाष्य केले.

Pune : राज्यामध्ये पिकविमा आणि फळपीक विम्यामध्ये मोठा गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. त्यातच बीड जिल्ह्यामध्ये सर्वांत जास्त बोगस पीक विम्याचे प्रकरणे समोर आलेले आहेत. यासंदर्भात विधानसभेतही आवाज उठवण्यात आला आहे. या गैरप्रकाराची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.

बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या कृषक कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या कामाचं कौतुक केलं असून कृषी क्षेत्रातील विविध विषयांवर भाष्य केले. येणाऱ्या काळात कृषी खात्यामध्ये चांगले बदल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे. 

"पिकविम्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आल्या. त्यामधील तथ्य अजून समोर आलं नाही. पण मी यासंदर्भात चौकशी लावली आहे. अॅग्रीस्टॅक पोर्टल आपण सुरू केलंय. त्या माध्यमातून शेतकऱ्यांची सर्व माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध होणार असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमाल उत्पादनाची माहिती आणि धोरण निश्चितीसाठी फायदा होणार आहे." असं ते म्हणाले.

"मी हाडाचा शेतकरी आहे. मी १९८४ साली एकरी १०० टन उस काढला म्हणून कोपरगाव सहकारी साखर कारखान्याने माझा सत्कार केला होता. जुन्या काळात पिकांवर औषध मारण्याची गरज नव्हती. फक्त इंड्रेल नावाचं औषध कापसावर मारलं जात होतं. पण वेळ बदलला, काळ बदलला आणि उत्पादन वाढलं पाहिजे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची बि-बियाणे मार्केटमध्ये आले. त्यासोबतच रोगराई आली आणि वातावरणाचं संतुलन बिघडत गेलं. यामध्ये शेतकऱ्यांना आपली पीकं वाचवणं आणि औषधं मारणं ही काळाजी गरज निर्माण झाली आहे."

"बारामती कृषी विज्ञान केंद्र ही कृषी क्षेत्रात काम करणारी भारतातील अग्रेसर संस्था आहे. ही संस्था उभी करण्यासाठी पवार कुटुंबियांनी मोठं योगदान दिलं आहे. आपल्याकडे माहिती आहे, चांगले संशोधन आहे पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. पण कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतात. हे तंत्रज्ञान गावापर्यंत पोहचलं पाहिजे." असंही मत कृषीमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलंय.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपीकपीक विमा