Join us

एक रुपयात पीकविमा पण हजारो शेतकरी वंचित.. कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 4:00 PM

फुलंब्री तालुक्यातील स्थिती

शासनाने १९९१ ला आदेश काढून फुलंब्री तालुक्यातील अनेक गावात गायरान जमिनीवर शेतीसाठी झालेली अतिक्रमणे नियमित केली. तसेच शेतकऱ्यांच्या नावे सातबारावर नोंदी घेतल्या. विशेष म्हणजे त्या जमिनी कसत असलेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले. परंतु या  जमिनीची नोंद वर्ग २ मध्ये असल्यामुळे हे शेतकरीपीकविमा योजनेपासून वंचित आहेत.

फुलंब्री तालुक्यातील अनेक गावांतील जमिनी या वर्ग दोनमध्ये असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या शेतकऱ्यांनी यापूर्वीही अनेक वेळा सदरील जमिनींची नोंद वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये करण्याची मागणी केली. यासाठी मोर्चे काढले, निवेदने दिली; परंतु प्रशासनाने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे सदर शेतकरीपीक विम्यापासून वंचित राहत आहेत.

नुकसान भरपाई कोण देणार?

यंदा एक रुपयात पीकविमा असतानाही शेतकऱ्यांना याचा लाभ घेता आला नाही. एकीकडे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पीक विमाही नाही, यामुळे नुकसानभरपाई कोण देणार, असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे.

शासनाने सदरील जमिनीचे प्रमाणपत्र देऊन त्या आमच्या नावे केल्या. मात्र त्या वर्ग २ मध्ये असल्याने अनेक अडचणी येत आहेत. त्यासाठी सदरील जमिनी वर्ग १ मध्ये घेऊन आम्हाला शासकीय योजनेत सामावून घ्यावे. -माधवराव बलांडे, शेतकरी, बोरगाव अर्ज

यावर्षी पीकविमा योजनेचे ऑप्शन ऑनलाइन असल्यामुळे वर्ग २ च्या शेतकऱ्यांचा पीकविमा निघाला नाही. काही सोल्युशन निघाले तर बघू,-कृष्णा कानगुले, तहसीलदार, फुलंब्री

आम्ही अनेक दिवसांपासून या जमिनी कसत आहोत. सदरील जमिनीचा पीकविमा यापूर्वी ऑफलाइन होता, तो आम्ही भरला होता. मात्र यंदा ऑनलाइन असल्याने आम्ही अपात्र झालो. शासनाने आमच्या जमिनीची नोंद वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये घ्यावी. -राजू पठाण, शेतकरी, बोरगाव अर्ज

वर्ग दोनच्या जमिनी म्हणजे काय?

शेतकऱ्याची ओळख त्याच्या जमिनीवरून होत असते. त्याची जमीन नक्की किती हे सातबारा वरून ठरते. या सातबारावर वर्ग एक वर्ग दोन असे उल्लेख अनेकदा दिसतात. 

वर्ग दोन ची जमीन ही अशी जमीन असते ज्यामध्ये जमीन असणाऱ्या व्यक्तीला जमीन विकण्याचा अधिकार नसतो. वतनाच्या स्वरूपात मिळालेल्या या जमिनी असल्याने या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारावर भोगवटदार वर्ग दोन असा उल्लेख असतो. परिणामी, जमिनीची मुळ मालकी या शेतकर्‍याकडे नसल्यामुळे पीक विमा मंजूर होतो पण लाभ मिळत नाही. 

टॅग्स :पीक विमाशेतकरीफुलंब्रीपीकपैसा