Join us
Daily Top 2Weekly Top 5

Crop Insurance : शेतकऱ्यांनो ई-पीक पाहणी करून घ्या; अन्यथा फळपीक विमा अर्ज होतील रद्द!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 20:18 IST

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ही योजना १२ जून रोजीच्या शासन निर्णयान्वये बीड जिल्ह्यात बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीमार्फत कार्यान्वित झाली आहे.

बीड : फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी फळपिकांचा विमा काढला आहे; परंतु फळपिकांची ई-पीक पाहणी मोबाइल अॅपद्वारे केलेली नाही. त्यांनी ई-पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ही योजना १२ जून रोजीच्या शासन निर्णयान्वये बीड जिल्ह्यात बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीमार्फत कार्यान्वित झाली आहे. मृग बहार सन २०२५मध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरु, सीताफळ व लिंबू या ७फळपिकांसाठी, तर आंबिया बहार सन २०२५-२६ मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, केळी, द्राक्ष, आंबा, पपई या ७फळपिकांसाठी फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे.

...तर लाभ मिळणार नाहीशेतकऱ्यांनी फळपिकांची ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे मोबाइल अॅपद्वारे करून घेणे बंधनकारक आहे. अन्यथा, शासन निर्णयामधील तरतुदीनुसार सातबारा उताऱ्यावर ई-पीक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील. फळपीक विम्याचा लाभ दिला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन एएसओ साळवे यांनी केले आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना मृग बहार २०२५ मधील पेरू, संत्रा, लिंबू व द्राक्ष या पिकांचा विमा काढण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता शेतकरी ३० जूनपर्यंत आपले अर्ज भरू शकतील.

पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना राज्यात मृग व आंबिया बहारमध्ये राबविण्यात येते.. मृग बहारमध्ये मंत्रा, पेरू, लिंबू, द्राक्ष या पिकांसाठी भोग घेण्याचा अंतिम दिनांक १४ जून २०२५ होता. विमा योजनेत भाग घेण्यासाठी काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा पोर्टल pmfby.gov.in हे १३ जूनला सुरू झाले होते. ४ पिकांना भाग घेण्यासाठी अतिशय अल्प कालावधी मिळाला. त्यामुळे हा कालावधी वाढवण्यासाठी राज्याकडून केंद्र

शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. मुदतवाढ मिळावी यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला. सदर प्रस्तावास केंद्र शासनाने अनुमती दिली असून आता संत्रा, पेरू, लिंबू, द्राक्ष या चार पिकांना विमा योजनेत भाग घेण्यासाठी अंतिम मुदत ३० जून अशी राहील. पेरू, लिंबू, द्राक्ष, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन विमा योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केले आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी