Join us

Crop Insurance : सावधान! बोगस पीक विमा अर्ज भरणाऱ्या सेतू सुविधा केंद्रांवर अखेर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 19:25 IST

शासनाच्या जमिनी किंवा इतरांच्या जमिनीवर बोगस पीक विमा अर्ज भरणाऱ्या सेतू सुविधा केंद्रावर कृषी विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Pune :  राज्यात एक रूपयांत पीक विमा योजना सुरू झाल्यानंतर राज्यातील पीक विमा अर्जाची संख्या कमालीची वाढली. पण याच काळात कमी पैशांत जास्त पैसे मिळावेत म्हणून अनेकांनी बोगस पीक विमा अर्ज भरले पण कृषी विभागाने या अर्जांचा भांडाफोड केला. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील ४० सामुहिक सुविधा केंद्रावर कृषी विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यामध्ये खरीप २०२४ हंगामात शासकीय जमीन, दुसऱ्या शेतकऱ्याची विनापरवानगी जमीन, अकृषक (NA) जमीन, बोगस सातबारे तयार करून जवळपास ४४५३ बोगस पीक विमा अर्ज दाखल करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार घडला. सदर अर्ज हे ४० सामूहिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विमा पोर्टलवर नोंदवण्यात आले होते. 

सदर सामूहिक सुविधा केंद्र चालकांनी विमा योजने संदर्भात त्यांच्यावर निश्चित केलेल्या जबाबदारीमध्ये कसूर केला. शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. म्हणून भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमान्वये त्यांचेवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड कार्यालयाने जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल केला आहे.

यासोबतच अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नसलेल्या पिकांचा विमा उतरवला असल्याच्या घटना मागच्या दोन वर्षांत आढळल्या होत्या. पण यंदा मात्र फार्मर आयडी आणि ई-पीक पाहणी अनिवार्य केल्यामुळे बोगस विमा अर्जाला आळा बसणार आहे. शेतकऱ्यांनी किंवा सामुहिक सुविधा केंद्रचालकांनी शाहनिशा केल्या शिवाय पिकविमा अर्ज भरू नये असे आवाहन करण्यात येत आहे. 

टॅग्स :पीक विमाशेती क्षेत्रशेतकरीपीक