Join us

Crop Damage : "मका नाही; हा तर शेतकरी झोपलाय" अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान झाल्यावर शेतकऱ्याची हृदयद्रावक प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 21:04 IST

राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही जिल्ह्यांमध्ये जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

Pune :  "माझा ८ बिघे मका काढणीला आला होता. त्याला मी नुकतेच पाणी दिले होते पण काल आलेल्या पावसामुळे या मक्याचे अतोनात नुकसान झालंय. खरंच या जगात देव असता तर देवाने आमचं असं नुकसान होऊ दिलं नसतं." अशी हृदयद्रावर प्रतिक्रिया आहे धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील प्रगतशील शेतकरी गणेश चौधरी यांची. 

राज्यभरातील विविध भागांत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे त्यांचा मका पूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे. यामुळे त्यांचे जवळपास १५० ते २०० क्विंटल मकाचे नुकसान झाले आहे.  या नुकसानीचे पंचनामे शासनाने करावेत आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती मदत देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

"माझ्या शेतात हा मका नाही तर आख्खा शेतकरीच झोपी गेलाय. डोळ्यात तेल घालून वाढवलेला मका आज डोळ्यादेखत जमीनदोस्त झाल्याचं बघवत नाही. हे खूप वाईट आहे" अशी प्रतिक्रिया त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

दरम्यान, राज्यात मागील तीन दिवसांपासून अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाडा, विदर्भ भागात ढगाळ वातावरण आहे. पण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, आंबा, इतर फळबागा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान होत आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी