टेंभुर्णी : जून महिन्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे चांदज (ता. माढा) व परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून मदत देण्याचे जाहीर केले. मात्र, अनेक गावांमध्ये पंचनामे याद्यांमध्ये गैरकारभार झाल्याने अनेक शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहिल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करून पुन्हा पंचनामे करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन दिले.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुहास पाटील, बापू शेंडगे, एकनाथ रूपनवर, नामदेव हेगडकर, धनाजी पाटील, वामन शेंडगे, अण्णासो पावसे, दादासाहेब गाडे, लक्ष्मण तांबवे, सुरेश लोकरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
कोंढारभाग परिसरातील अनेक गावांमधील डाळिंब, पेरू, केळी, आंबा, ऊस, मका पिके जमीनदोस्त होऊन शेती पिकांचे नुकसान झाले. राज्य सरकारने अतिवृष्टी व वादळामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, संबंधित कृषी सहायक अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल यांच्या पंच कमिटीने शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर न जाता केवळ संबंधितांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पंचनामे करण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊनसुद्धा पंचनामे न झाल्याने अनुदानापासून वंचित राहिले.
बोगस पंचनाम्यातून लूटअतिवृष्टी परिस्थितीमध्ये शासन मदत देण्याचा निर्णय जाहीर करून पंचनाम्याचा आदेश दिल्यानंतर पंच कमिटीतील अधिकारी व कर्मचारी हे शेतकऱ्यांशी संगनमताने शासकीय अनुदान लाटण्याचे अनेक वेळा प्रकार झाले आहेत. असे प्रकार उघड झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून वसुली झाली आहे. काही शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजाही चढवण्यात आला.
पंच कमिटीतील हे कर्मचारी गावांमधील त्यांच्या काही संबंधित व्यक्तींच्या माध्यमातून बोगस पंचनामे करून अनुदानाची आलेली रक्कम ५० टक्के त्या शेतकऱ्यांकडून घेतली जात असल्याची चर्चा शेतकऱ्यांमधून होत आहे.