Join us
Daily Top 2Weekly Top 5

बांबूच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण व्यवसाय निर्मिती; नाबार्ड करणार सहकार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 13:19 IST

बांबू आधारित व्यवसायाकरिता नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

बांबू आधारित व्यवसायाकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मुंबईत मंत्रालयातील परिषद सभागृह येथे बांबू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, नाबार्डचे महाप्रबंधक डॉ.प्रदीप पराते, एमडीबीचे पी.कल्याणकुमार यांच्यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले की, शेतकरी समुहासाठी बांबू उत्पादक समूह नाबार्डच्या सहयोगाने प्रकल्प तयार करण्यासाठी बांबू क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर शासनाने भर दिला आहे. ससमिरा, वरळी मुंबई यांचे मार्फत बी.आर.टी. ला बांबूपासून वस्त्रोद्योग निर्मितीसाठी संशोधन प्रकल्प सादर करण्यात आला आहे. वन विभागाने समिती नेमून याबाबत योग्य ती कार्यवाही करावी. महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज मुंबई यांच्याकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे बांबू आधारित स्किल डेव्हलमेंटकरिता व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम राबवावा, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील विशेषत: चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सामूहिक उपयोगिता केंद्राना सूक्ष्म उद्योगाचा दर्जा देण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी.

राज्यातील विविध क्षेत्रातील महिलांना बांबू आधारित कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन समितीमध्ये अथवा नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत निधीची तरतूद करावी, अशा सूचना मंत्री मुनगंटीवार यांनी बैठकीत  दिल्या.

टॅग्स :शेती क्षेत्रबांबू गार्डनशेतकरीशेतीमहिला