Pune : राज्यातील गौ उत्पादनांना विक्रीव्यवस्थेत चालना मिळावी म्हणून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर गौ-उत्पादन विक्री दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने राज्यात असलेल्या गोशाळांकडून आपापले उत्पादने एसटी स्टँडवर विक्री केले जात आहेत. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान, गोसेवा आयोगाकडे नोंदणी झालेल्या गोशाळांचे गोमय मुल्यवर्धित उत्पादनाची विक्री करण्यासाठी बसस्थानकाच्या आवारात तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यानंतर आता प्रत्येक बसस्थानकामध्ये त्या त्या परिसरातील गोशाळेने गो उत्पादने विक्रीचे स्टॉल लावलेले आहेत.
या उपक्रमामुळे गोउत्पादनांचा जन सामान्यांत प्रचार होऊन भविष्यात त्यांच्या गोमय वस्तूंसाठी बाजारपेठ निर्माण होऊ शकेल व गोशाळा स्वयंनिर्भर होण्यास मदत होणार आहे. राज्यातील साधारण ८९० गोशाळांची नोंदणी महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे झालेली आहे. या गोशाळांकडून गोसंवर्धनाचे काम करण्यात येत आहे.
तर महाराष्ट्र गोसेवा आयोगाकड नोंदणी झालेल्या गोशाळांपैकी अनेक गोशाळा ह्या मूल्यवर्धित उत्पादने तयार करतात. या उत्पादनांना विक्रीसाठी व्यासपीठ मिळाले आणि ब्रँडिंग, मार्केटिंग करता यावी यासाठी गोसेवाा आयोगाने ३० एप्रिल म्हणजेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गोउत्पादने विक्री दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.