प्रकाश काळे
गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी, अंतरगाव, गोयेगाव शेतशिवारात कापूस वेचणी (Cotton picking) करीत असताना सोमवारी दुपारच्या सुमारास महिलांना(Women) शेतात वाघ दिसला. घाबरलेल्या महिला व शेतकऱ्यांनी कापूस वेचणीचे काम बंद केले. सध्या शेतकरी व नागरिकांत वाघाची(Tigar) दहशत आहे. वाघामुळे परिसरात शेतीचे कामे प्रभावित झाले आहे.
राजुरा तालुक्यातील गोवरी येथील शेतकरी बाळकृष्ण नामदेव काळे यांची अंतरगाव शेतशिवारात शेती आहे. या शेतीला तीन गावांची सीमा लागून आहे. काळे यांच्या शेतात सोमवारी सकाळी महिला कापूस वेचणी करायला गेल्या.
कापूस वेचणी करीत असताना महिलांना अचानक समोर वाघ दिसला. त्यांनी आरडाओरडा केला. त्यांनतर घाबरलेल्या महिलांनी व शेतकऱ्यांनी कापूस वेचणी बंद करीत वनविभागाला माहिती दिली.
लगेच राजुरा येथील वनविभागाचे कर्मचारी व काही शेतकऱ्यांनी वाघाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वाघ दिसला नाही. या परिसरात वेकोलिच्या कोळसा खाणी असल्याने तसेच मातीवर झुडपी जंगल तयार झाल्याने वाघ झुडुपात दबा धरून बसला असावा, असा अंदाज व्यक्त केले जात आहे.
साहेब, वाघाचा बंदोबस्त करा हो
शेतात वाघ दिसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी कापूस वेचणी बंद केली आहे. सध्या शेतात कापूस, गहू, हरभरा, ज्वारी पिके उभे आहे. गोवरी, अंतरगाव, गोयेगाव परिसरात अचानक कापूस वेचणी करायला गेलेल्या महिलांना वाघ समोरासमोर दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कोळसा खाणीमुळे झुडपी जंगल
* वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव, अंतरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणी आहेत.
* कोळशाचे उत्खनन करताना निघणाऱ्या मातीचे महाकाय ढिगारे वेकोलिने गाव तसेच शेतीच्या परिसरात टाकल्याने मातीवर झुडपी जंगल निर्माण झाले. याठिकाणी वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने रानडुक्कर व वाघ यासारखे वन्यप्राणी लपून राहत असल्याने त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
शेतीची कामे प्रभावित
गोवरी, अंतरगाव, गोयेगाव परिसरात कापूस वेचणी करायला गेलेल्या महिलांना वाघ दिसल्याने शेतीची कामे सध्या प्रभावित झाली आहे. अनेकांनी शेतात जाणेही बंद केले आहे. कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.