Join us

सारखी वीज गेली तर सांगा कसे द्यायचे द्राक्षाला पाणी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 11:00 AM

शेतकऱ्यांचा खोळंबा...

दिवसातून अनेकदा खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे द्राक्ष शेतीला पाणी कसे द्यावे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून  खंडित वीजपुरवठ्याबाबत होणाऱ्या तक्रारींकडे महावितरणच्या  कार्यालयाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गावातील शेतकऱ्यांनी केला आहे.

सिद्धपिंप्री हे मोठे गाव असून, वीज वितरण विभागाचे गावात कार्यालय आहे. पाच ते सहा कर्मचारी येथे कार्यरत असतात. मात्र, शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण होत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे अनेकदा वीज वितरण विभागाच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात.

शेतकऱ्यांचा द्राक्षाचा हंगाम सुरू असून, शेतकऱ्यांना कीटकनाशकांची फवारणी व द्राक्षाला पाणी द्यावे लागते. परंतु दिवसातून तीन ते चार वेळेस वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेती कामाचा खोळंबा होत आहे. सिद्धपिंप्री येथील वीज कार्यालयात लेखी तक्रार देऊनही निवारण होत नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वीज ग्राहकाचे वीज बिल थकल्यास त्याचा वीजपुरवठा तत्परतेने खंडित केला जातो. अशीच तत्परता वीज कर्मचारी, अधिकारी तक्रार निवारणात का दाखवित नाहीत, असा सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारी बाबत वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने प्रश्न सोडविणे गरजेचे असून, याबाबत वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही तशा सूचना द्याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या द्राक्षाचा हंगाम सुरू असून, शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत होणे गरजेचे आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट घेऊन चर्चा करणार आहोत, असे सरपंच भाऊसाहेब ढिकले यांनी सांगितले.

टॅग्स :शेतकरीनाशिकवीज