Join us

शेतकऱ्यांना दिलासा! अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; थेट खात्यात होणार रक्कम जमा

By दत्ता लवांडे | Updated: October 1, 2024 21:15 IST

Crop Damage Farmer Help : यावर्षीच्या जुले व ऑगस्ट या दोन महिन्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासनाने निधी मंजूर केला आहे. 

Heavy Rain Crop Damage : राज्य सरकारने निवडणुकांच्या तोंडावर शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्याचा तडाखा लावला आहे. यामध्ये अनुदान वाटप, नुकसान भरपाई वाटप आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी, प्रचार-प्रसिद्धीसाठी निधींची तरतूद करण्यात येत आहेत. तर यावर्षीच्या जुले व ऑगस्ट या दोन महिन्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासनाने निधी मंजूर केला आहे. 

दरम्यान, यंदा मान्सूनच्या पावसाने दमदारपणे हजेरी लावली पण जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये खरिपातील पिकांचे आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने १३८ कोटी ५५ लाख ४८ हजार रूपयांचे वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. 

जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या तीन हेक्टरच्या मर्यादेत या अनुदानाचे वाटप करण्यात येणार असून डीबीटी प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना थेट मदतीचा लाभ मिळणार आहे. 

ही मदत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी, कोणत्या पिकांच्या नुकसानीसाठी आणि किती शेतकऱ्यांना मिळणार याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पण निवडणुकांच्या तोंडावर आणि दिवाळीच्या आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याने दिलासा मिळणार आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीमहाराष्ट्र