खरीप हंगामात झालेले नुकसान कसे भरुन काढावे, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत असतानाच अचानक रासायनिक खतांचेChemical fertilizers भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
रासायनिक खतांच्याChemical fertilizers किमती आधीच जास्त असताना खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून दरवाढ जाहीर केली आहे. त्यानुसार रासायनीक खतांच्या किमतीमध्ये २०० ते ३०० रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
शेतकऱ्यांना आधीच त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोयाबीनचे दर वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी विक्री थांबवली होती; मात्र उलट दर कमी झाले. खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून रासायनिक खतांच्या किमती वाढवल्या आहेत.
वाढीव दरानुसार डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट) खताची किंमत प्रतिपिशवी १ हजार ३५० रुपयांवरून १ हजार ५९० रुपयांवर गेली आहे. टीएसपी ४६ टक्के (ट्रिपल सुपर फॉस्फेट) खताची किंमत १३०० ऐवजी १३५०, तर १०:२६:२६ आणि १२:३२:१६ या खतांच्या किमती १४७० रुपयांवरून १७२५ रुपये होणार आहे. या परिस्थितीत, शेतकरी वर्गातून खतांच्या किमती वाढवण्याऐवजी कमी करण्याची मागणी होत आहे.
त्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी योग्य बाजारभाव मिळावा, तसेच शेतीसाठी आवश्यक निविष्ठांच्या किमती नियंत्रणात ठेवाव्या, अशी मागणी आहे.
शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी अधीच मेटाकुटीला आला आहे. रासायनिक खताचे दर अगोदरच जास्त आहेत. त्यात पुन्हा किमती वाढून शेतकऱ्यांना अधिकचा भुर्दंड बसणार आहे. - गजानन इंगळे, शेतकरी
रासायनिक खताच्या अधिकच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांनी पर्यायी मार्ग म्हणून सेंद्रिय खत व बायोखत यावर भर द्यावा. शेतातील पिकासाठी आवश्यकता असली तरच शेतकऱ्यांनी खताचा वापर करावा. - अर्जुन राजनकार, कृषी विक्रेता
रासायनिक खत कंपन्याचे दर अगोदरच जास्त आहेत. दर वाढवल्यामुळे शेतकरी चारऐवजी दोनच बॅग घेईल. शेतमालाला भाव नसल्याने सध्या शेतकरी हैराण झाला आहे. त्यातच १०:२६:२६ची उपलब्धता नाही. रासायनिक खताबरोबरची लिंकिंग थांबली पाहिजे. - चेतन बघे, शेतकरी
खतांच्या वाढत्या किमतीचा तपशील
खताचे नाव | सध्याचे दर | वाढीव दर |
डीएपी | १३५० | १५९० |
टीएसपी ४६ | १३०० | १३५० |
१०:२६:२६ | १४७० | १७२५ |
१२:३२:१६ | १४७० | १७२५ |