Join us

हळद विकायला आणली आणि 'अवकाळी'ने केला घात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 4:07 PM

हळद वाचवण्याची शेतकऱ्यांची धडपड; मार्केट यार्डातील स्थिती

हिंगोली जिल्ह्यात मागील आठवड्यापासून अवकाळी संकट पाठ सोडत नसून, शेतात काढून ठेवलेल्या हळदीवर पावसाचे पाणी फेरल्या जात असताना ज्या शेतकऱ्यांनी घाईगडबडीत हळद काढून विक्रीसाठी आणली, त्या हळदीवरही अवकाळीचा मारा होत आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसापासून मार्केट यार्डात विक्रीसाठी आणलेली हळद वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागली.

जिल्ह्यातील बहुतांश भागात सध्या हळद काढणीचे काम सुरू आहे, तर काही शेतकऱ्यांचे हळद काढणीचे काम आटोपले आहे. ज्यांच्याकडे हळद तयार झाली ते शेतकरी आता विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या मार्केट यार्डात आवक वाढली असून सोमवार ते शुक्रवार दरम्यान दररोज जवळपास तीन ते चार हजार क्विंटलची आवक होत आहे. तर, शनिवार आणि रविवारी मार्केट यार्डातील हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत.

१२ एप्रिल रोजी शेकडो शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी आणली होती. त्यामुळे वाहनांची रांग मार्केट यार्ड आवाराबाहेरील रस्त्यावर लागली होती. यादरम्यान रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली होती. पावसात हळद भिजू नये यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागली.

तसेच यादरम्यान वाहनातील हळदीला पावसाचे पाणी लागल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.

अवकाळी संकट पाठ सोडेना...

जिल्ह्यात मागील आठवड्यापासून अधूनमधून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा मारा होत आहे. शेतात काढून ठेवलेल्या हळदीवर या पावसाचे पाणी फेरल्या जात आहे. तर, आंब्यासह फळबागांनाही फटका बसत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शनिवारीही दिवसभर उकाड्यात वाढ झाली होती तसेच ढगाळ वातावरणही कायम होते.

टॅग्स :पीकपाऊसशेतकरीबाजार