सिल्लोड : सी-वन वाणाच्या मिरचीचे निकृष्ट दर्जाचे बियाणे उत्पादित करून त्याची रोपे तयार करून ती विक्री करण्यात आली. यामुळे तालुक्यातील ४ हजार हेक्टर क्षेत्रावरील मिरचीचेपीक निष्फळ निघाले असून यात ५ हजार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. (Bogus Mirchi)
याप्रकरणी बुलढाणा येथील एका कंपनीच्या संचालकासह नर्सरीचालक, विक्रेते अशा एकूण ७ जणांविरोधात गुरुवारी दुपारी २ वाजता सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Bogus Mirchi)
ही आहेत आरोपी
बुलढाणा येथील ग्रीन प्लॉटो सीइस कंपनीचे संचालक श्रीकृष्ण नारायण शिंदे (रा. पाडली शिंदे, ता. देऊळगाव राजा), कंपनीचे प्रतिनिधी गणेश परदेशी (रा. पाचोरा, जि. जळगाव), सिल्लोडमधील शिवनी ॲग्रो एजन्सीचे मालक गोपाळ जंजाळ, भायगाव येथील मे. आदेश ग्रीन व्हॅली रोपवाटिकेचे मालक सतीश दौलत भागवत, धावडा येथील ओमसाई हायटेक रोपवाटिकेचे मालक हरिदास काशीनाथ दिवटे, निल्लोड येथील श्रीसाई ॲग्रो नर्सरीचे मालक नामदेव नबाजी जाधव, सारोळा येथील जानवी हायटेक रोपवाटिकेचे मालक सोमनाथ लक्ष्मण पुरी अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, सदर कंपनीने सी-वन वाणाच्या मिरचीचे बियाणे निकृष्ट दर्जाचे तयार केले होते. त्यानंतर सदर आरोपींनी संगनमताने ती बियाणे रोपवाटिकेत लावून रोपे तयार केली आणि विक्रेत्याच्या वतीने तब्बल पाच हजार शेतकऱ्यांना २७ फेब्रुवारी २०२४ ते ३० जुलै २०२४ दरम्यान विक्री केली.
त्यामुळे तालुक्यातील १० हजार एकर क्षेत्रावरील मिरची पीक निष्फळ निघाल्यामुळे पाच हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांची फसवणूक झाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
'या' शेतकऱ्यांनी केली तक्रार
याप्रकरणी विलास मुळे, सुरेश मुळे (दोघे रा. केळगाव), योगेश आहेर (रा. निल्लोड), शंकर मांडवे (रा. रेलगाव), योगेश फरकाडे (रा. पिंपळदरी) या शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर तत्कालीन पं. स. चे कृषी अधिकारी संजय व्यास, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे, कृषी विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र नैनवाड, डॉ. आशिष बागडे, एस. जी. तोटरे, प्रमोद डापके यांनी मिरची पीक व नर्सरीमधून विक्री झालेल्या मिरची रोपांची पाहणी करून पंचनामे केले तसेच प्रयोगशाळेत त्याची तपासणी केली असता सदर बियाणे निकृष्ट दर्जाचे आढळले.
हे ही वाचा सविस्तर : Bogus Seeds: बोगस बियाणे विकणाऱ्यांची आता खैर नाही वाचा सविस्तर