Join us
Daily Top 2Weekly Top 5

Beed Custard Apple : भौगोलिक मानांकन मिळूनही बीडच्या बालाघाट सिताफळाला मिळतोय केवळ १० ते १२ रूपये किलोंचा दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 19:34 IST

Beed Custard Apple : बीडच्या सिताफळाला सध्या केवळ १० ते १२ रूपये किलोंचा दर मिळतोय. त्यामुळे या भौगोलिक मानांकनाचा शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाही.

Beed Custard Apple : राज्यातील ३८ कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. बीडचे सिताफळ हे त्यातीलच एक. पण सध्या बीडच्या सिताफळाला केवळ १० ते १२ रूपयांचा दर मिळताना दिसत आहे. त्यामुळे मिळालेल्या भौगोलिक मानांकनाचा फायदा या सिताफळाला होताना दिसत नाही. 

दरम्यान, बीडमधील बालाघाटाच्या डोंगररांगेत मोठ्या प्रमाणावर केशर आंबे आणि सिताफळाचे पीक घेतले जाते. प्रामुख्याने येथे पिकणारे सिताफळ हे जंगलातील आहे. येथील तुरळक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत सिताफळाची लागवड केली आहे, पण डोंगरातील कोणत्याच खते-औषधांशिवाय येणाऱ्या सिताफळाला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. 

जंगलात पिकणारे सिताफळ खायला गोड आणि गर जास्त असणारे आहे. तोडल्यानंतर तिसऱ्या दिवशी हे सिताफळ पिकते किंवा खाण्यासाठी तयार होते. बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगररांगेतील शेतकरी जंगलातील सिताफळ तोडून आणून विकतात. पण या सिताफळाच्या २० किलोच्या एका क्रेटला केवळ २०० ते २५० रूपयांचा दर मिळत आहे. 

अनेक स्थानिक तरूण येथील सिताफळ जमा करून पुणे, अहिल्यानगर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी घेऊन येतात, त्यांना १५ रूपयांपासून ३५ रूपये किलोप्रमाणे बाजारात दर मिळतो. पण शेतकऱ्यांना मिळणारा दर हा केवळ १० ते १२ रूपयांचा आहे. या सिताफळाचे अर्थकारणाला चालना मिळण्याची गरज आहे.

का मिळते भौगोलिक मानांकन?भौगोलिक वैशिष्ट्यांनी पूर्ण असलेल्या शेती उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ तयार व्हावी, पुढील दहा वर्षे इतर प्रदेशातल्या अनाधिकृत उत्पादनांची भेसळ होण्यापासून रोखणे, चांगला दर मिळणे या गोष्टीसाठी वैशिष्ट्यपूर्ण शेती उत्पादनांना भौगोलिक मानांकन देण्यात येते.

मी मागच्या आठवड्यामध्ये एक टेम्पो भरून सिताफळ अहिल्यानगर येथे नेली होती. तिथे मला ३२ रूपये किलोप्रमाणे दर मिळाला. पण शेतकऱ्यांकडून सिताफळ जमा करणे, गाडीत भरण्यासाठी तरूणांची मजुरी आणि बाजार समितीपर्यंत नेण्याचा खर्चही होतोच. सध्या आवक वाढल्याने दर कमी आहे.- योगेश दिवटे (सिताफळ उत्पादक आणि विक्रेता, गारमाथा, ता. पाटोदा, जि. बीड) 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपीकबाजार