गोवर्धन गावंडे
हवामान बदल, निसर्गातील असमतोल आणि बाजारातील चढ-उतार यामुळे पारंपरिक शेती मोठ्या संकटात सापडली असतानाच हिवरखेड येथील दोन तरुणांनी आधुनिक दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने केळीच्याशेतीत यशस्वी प्रयोग केला आहे. (Banana Farming)
एवढेच नव्हे तर आपल्या शेतात पिकलेल्या केळीची थेट इराणपर्यंत निर्यात करून इतर तरुण शेतकऱ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.(Banana Farming)
नोकरी सोडून शेतीकडे वळलो
हिवरखेड येथील इंजिनिअर अनिरुद्ध अरविंद भोपळे आणि कृषी पदवीधर तुषार राजेंद्र भोपळे या दोन भावांनी पारंपरिक शेतीपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला.
नोकरीच्या मागे न लागता त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर केळीची लागवड केली. दर्जेदार उत्पादनासाठी चिकाटी, मेहनत आणि सातत्य यावर त्यांनी भर दिला.
सातासमुद्रापार गाठला बाजार
भोपळे बंधूंनी केळीचं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन घेतल्यावर केवळ स्थानिक बाजारपेठांवर विसंबून न राहता थेट निर्यात करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अजिंक्य ताकीक आणि हनुमंत खबाले यांनी त्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे हिवरखेडमधील शेतातील केळी थेट इराणच्या बाजारात पोहोचली.
भोपळे बंधूंचा सन्मान
अशा उल्लेखनीय यशाबद्दल भोपळे बंधूंना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक प्रकाश रेखाते होते. यावेळी राजेंद्र भोपळे, श्यामशिल भोपळे, विनय राठी, आनंद बोहरा, अनिल भोपळे, सचिन कोरडे, चंद्रकांत राऊत, प्रा. कौस्तुभ भोपळे, तुळशिराम शिरोडकर, अनंता इंगळे, गजानन बंड, दिनकरराव भोपळे, बबलू टोहरे, कृषी मंडळ अधिकारी गौरव राऊत तसेच विकास पल्हाडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
आधुनिक शेतीचं उदाहरण
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मेहनत आणि योग्य बाजारपेठ यामुळे शेतीत यश मिळू शकतं, हे भोपळे बंधूंनी सिद्ध करून दाखवलं आहे. वाढत्या महागाईत आणि अनियमित हवामानातही त्यांनी मिळवलेलं हे यश निश्चितच शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल.